IND vs WI 1st ODI: तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या रोमांचक सामन्यात भारतानं 3 धावांनी वेस्ट इंडीजचा पराभव केलाय. पोर्ट ऑफ स्पेनच्या (Port of Spain) क्वीन्स पार्क ओव्हल (Queen's Park Oval) येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात विजय मिळवून भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं 50 षटकात सात विकेट्स गमावून वेस्ट इंडीजसमोर 309 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजच्या संघानं 49 षटकात 5 विकेट्स गमावून 294 धावा केल्या. अखेरच्या षटकात वेस्ट इंडीजच्या संघाला 15 धावांची गरज असताना भारताचा युवा फलंदाज आणि विकेकिपर संजू सॅमसननं (Sanju Samson) जबरदस्त डाईव्ह लावत एक षटकार वाचवला. ज्यामुळं सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. 


वेस्ट इंडीजच्या संघाला अखेरच्या षटकात 15 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी कर्णधार शिखर धवननं चेंडू भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या हातात सोपवला. या षटकातील पहिल्या चार चेंडूत 7 धावा दिल्या. त्यानंतर अखेरच्या दोन चेंडूत वेस्ट इंडीजला 8 धावांची गरज होती. फलंदाजाचा पाठलाग करत मोहम्मद सिराजनं पाचवा चेंडू वाईड फेकला. या चेंडूला रोखण्यासाठी संजू सॅमसननं मोठी झेप घेतली. हा चेंडू संजूनं रोखला नसता तर वेस्टइंडीजच्या संघाला वाईड बॉलसह पाच धावा मिळाल्या असत्या. 


व्हिडिओ-



शिखर धवन- शुभमन गिल जोडीची कमाल
नाणेफेक जिंकल्यानंतर वेस्ट इंडीजच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलं. भारताकडून धवन आणि (97 धावा) आणि गिल (64 धावा) यांनी शतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर गिल धावबाद झाला आणि धवनचंही शतक हुकलं. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या अय्यरनं अर्धशतक झळकावत संघाला चांगल्या स्थितीत आणलं. भारतीय मधल्या फळीला काही खास कामगिरी करता आली नाही. पण अखेरीस दीपक हुडा आणि अक्षर पटेल यांच्या जोडीच्या जोरावर भारतानं 300 चा टप्पा पार केला.


भारताची भेदक गोलंदाजी
309 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजकडून काइल मेयर्सनं सर्वाधिक 75 धावा केल्या. ब्रुक्सनं 46 धावा केल्या. ब्रँडन किंगनं 66 चेंडूत 54 धावा केल्या. तर, कर्णधार निकोलस पूरन 25 धावा करून बाद झाला. अकील हुसेन 33 आणि शेफर्ड यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचून संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अपयशी ठरले. 


हे देखील वाचा-