कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरी वनडे मॅच कोलंबोत सुरु आहे. या मॅचमध्ये श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेकडून निसांका आणि फर्नांडो यांनी चांगली सुरुवात करुन दिली. श्रीलंकेनं निसांका, फर्नांडो आणि कुसल मेंडिस या तिघांच्या फलंदाजीच्या जोरावर भारतासमोर धावांचं विजयासाठी 249 आव्हान ठेवलं. श्रीलंकेनं 50 ओव्हरमध्ये 7 बाद 248 धावा केल्या. भारताकडून रियान परागनं 3 विकेट घेतल्या.
भारतानं आज केएल राहुल आणि अर्शदीप सिंग यांना वगळून रिषभ पंत आणि रियान परागला स्थान दिलं होतं. रियान परागला संघात स्थान देण्याचा निर्णय योग्य ठरला. रियान परागनं श्रीलंकेच्या तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
श्रीलंकेच्या अविष्का फर्नांडोनं 96 धावा केल्या. पथुम निसांकानं 45 धावा केल्या. यानंतर श्रीलंकेचा डाव कुसल मेंडिसनं सावरला. कुसल मेंडिसनं 59 धावा केल्या.
रियान परागचं दणक्यात पदार्पण
रियान परागला रोहित शर्मानं अर्शदीप सिंगच्या जागी संघात स्थान दिलं होतं. विराट कोहलीच्या हस्ते भारतीय संघाची कॅप देऊन रियान परागचं स्वागत करण्यात आलं. रियान परागनं टी 20 मालिकेतील कामगिरी प्रमाणं वनडे मध्ये देखील दमदार कामगिरी केली. रियान परागनं 96 धावांची खेळी करणाऱ्या अविष्का फर्नांडोला बाद करत एकदिवसीय क्रिकेटमधील पहिली विकेट मिळवली. यानंतर रियान परागनं श्रीलंकेचा कॅप्टन चारिथ असलंका याला देखील बाद केलं. पहिल्या दोन्ही मॅचमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या दुनिथ वेल्लालगे याला देखील रियान परागनं बाद करत तिसरी विकेट मिळवली
भारतापुढं विजयासाठी किती धावांचं आव्हान?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या दोन पैकी एक मॅच टाय झाली होती. यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये श्रीलंकेनं भारताला पराभूत केलं होतं. आज श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतासमोर विजयासाठी 249 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
रोहित शर्मा- विराट कोहलीवर मोठी जबाबदारी
भारतानं 1997 पासून श्रीलंकेविरुद्ध एकही वनडे मालिका गमावलेली नाही. भारतानं गेल्या 27 वर्षात 11 मालिकांमध्ये श्रीलंकेला पराभूत केलं होतं. तीन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंका 1-0 अशी आघाडीवर असल्यानं भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या कार्यकाळातील पहिली एकदिवसीय मालिका असल्यानं भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे. भारताला विजय मिळवायचा असल्यास रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर मोठी दबाबदारी असेल.
संबंधित बातम्या :
श्रीलंकेविरुद्ध आज 'करो या मरो'ची लढाई; भारतीय संघात होणार मोठे बदल, पाहा संभाव्य Playing XI