India vs Sri Lanka, Asia Cup Final : आशिया चषकात श्रीलंकेचा दहा विकेटने पराभव करत भारताने आठव्यांदा जेतेपदावर नाव कोरले. मोहम्मद सिराज याने अंतिम सामन्यात भेदक मारा करत विजयात मोठा वाटा उचलला. आशिया चषकाच्या फायनल सामन्यात टीम इंडियाने एकतर्फी विजय मिळवला. श्रीलंका संघाला ५० धावांवर रोखले. त्यानंतर दहा विकेटने विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले.  


टीम इंडियाच्या शानदार कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्माने उचलेल्या पावलाने सर्वांची मने जिंकली आहेत. आशिया चषक ट्रॉफी हातात घेतल्यानंतर रोहितने सेलिब्रेशनदरम्यान टीमच्या सपोर्ट स्टाफमधील स्पेशलिस्ट रघू उर्फ ​​राघवेंद्र याच्या हातात दिली. रोहितच्या या निर्णायाचे कौतुक होतेय. 


ट्रॉफीसोबत टीम इंडिया सेलिब्रेशन करत होती. त्यावेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने हातवारे करत रघूला स्टेजवर बोलावले. त्यानंतर त्याने रघूला ट्रॉफी दिली आणि सर्व खेळाडूंसोबत त्याने या विजेतेपदाचा आनंद साजरा केला. रघू हा सपोर्ट स्टाफमधील महत्वाचा सदस्य आहे. तो पडद्यामागे आपले काम चोख पार पाडतो.  


टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील रघू महत्वाचा सदस्य - 


राघवेंद्र उर्फ ​​रघू हा टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील महत्वाचा सदस्य आहे.  तो एक थ्रो डाउन स्पेशालिस्ट आहे, जो नेट प्रॅक्टिस दरम्यान जास्त वेगाने बॉल फेकतो. जेणेकरून फलंदाज वेगवान गोलंदाजांविरूद्ध स्वत: ला तयार करू शकतात. 2011-12 मध्ये ऑस्ट्रेलियन दौऱ्यात रघूने टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये प्रवेश केला होता. यानंतर, 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी त्याला पुन्हा सपोर्ट स्टाफमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. म्हणजे दशकभरापासून तो भारतीय संघाचा एक महत्वाचा भाग आहे.


टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये रघूचा समावेश करण्याचे श्रेय सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या दिग्गजांना जाते. रघू बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत होता. त्यावेळी त्याने सचिन आणि द्रविडला सराव करायला लावला. यानंतर या दोघांच्या शिफारसीमुळे रघूला सपोर्ट स्टाफचा भाग बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. तो आतापर्यंत भारतीय संघाचा महत्वाचा भाग आहे.