India's Probable Playing XI : विश्वचषकाच्या रणांगणात रोहित शर्माच्या भारतीय संघाचा सामना आज श्रीलंकेशी होतोय. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. भारतानं विश्वचषकाच्या मोहिमेत आतापर्यंत सहापैकी सहाही सामने जिंकले आहेत. त्यामुळं विश्वचषकाच्या गुणतालिकेत सर्वाधिक 12 गुणांसह भारत अव्वल स्थानी आहे. पण सातव्या स्थानावरच्या श्रीलंकेला सहापैकी केवळ दोनच सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. त्यामुळं विश्वचषकातलं आव्हान टिकवण्यासाठी श्रीलंकेला बलाढ्य भारतीय संघावर विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यासाठी श्रीलंकेची भिस्त हील प्रामुख्यानं सदीरा समराविक्रमा, पाथुम निसांका आणि कुशल मेंडिस या तीन फलंदाजांवर राहिल. त्या तिघांनीही विश्वचषकात धावांचा रतीब घातला आहे. तसंच दिलशान मधुशंका आणि कासून रजिथा या वेगवान गोलंदाजांचं आक्रमण यशस्वी ठरताना दिसत आहे. वानखेडे स्टेडिअमवर श्रीलंकेविरोधात भारतीय संघात बदल होणार का ? याच्या चर्चा सुरु आहे. श्रेयस अय्यरच्या खराब फॉर्ममुळे टीम इंडिया चिंतेत आहे. त्यामुळे भारतीय संघात बदल होणार का ? अशा चर्चा रंगल्या आहेत. पाहूयात श्रीलंकेविरोधात टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये काय बदल होऊ शकतात... 


काय होऊ शकतात बदल - 


रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला उतरणार हे निश्चित आहे. रोहित शर्माने आतापर्यंत विश्वचषकात वादळी फलंदाजी करत धावा काढल्या आहेत. शुभमन गिल अद्याप हवा तसा लयीत दिसला नाही. चार सामन्यात त्याला फक्त एक अर्धशतक ठोकता आलेय. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीचे स्थान निश्चित आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर विराट कोहलीकडून 49 व्या शतकाची चाहत्यांना अपेक्षा असेल. 


आघाडीचे तीन खेळाडू श्रीलंकेविरोधात निश्चित असतील. पण चौथ्या क्रमांकावर बदल होण्याची शक्यता आहे. फॉर्मात नसलेल्या श्रेयस अय्यरला आराम दिला जाण्याची शक्यात आहे. डावखुरा फलंदाज ईशान किशनला चौथ्या स्थानावर फलंदाजीस संधी मिळू शकते. ईशान किशन याने गिलच्या अनुपस्थितीत दोन सामन्यात सलामीची भूमिका पार पाडली आहे. पण आता तो मध्यक्रममध्ये खेळण्याची शक्यता आहे.  चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर ईशान किशन आणि केएल राहुल खेळतील.. 


सहाव्या स्थानावर सू्र्यकुमार यादवचे स्थान निश्चित आहे. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले होते. इंग्लंडविरोधात त्याने शानदार कामगिरी केली होती. हार्दिक पांड्या पुढील दोन सामन्याला उपलब्ध नाही. त्यामुळे सूर्यकुमार यादवचे संघातील स्थान निश्चित मानले जातेय. सातव्या क्रमांकावर अष्टपैलू रविंद्र जाडेजा असेल.. जाडेजाने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीत योगदान दिलेय.


गोलंदाजीत बदल ?


गोलंदाजीमध्ये बदल होण्याची शक्यता कमीच आहे. फिरकीची जबाबदारी कुलदीप यादव याच्यावर असेल. त्याच्या जोडीला सूर्यकुमार यादव असेलच. वेगवान मारा बुमराह, सिराज आणि शामी यांच्या खांद्यावर असेल. 
 
श्रीलंकाविरोधात भारताची संभावित प्लेइंग इलेवन


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव,  रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.