Ind vs SL T20: भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा (Ind vs SL) पराभव करून मालिका 3-0 ने जिंकली. दोन्ही संघांनी 20 षटकात आपापल्या डावात 137 धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहचला. सुपर ओव्हरमध्ये भारताने श्रीलंकेला फक्त 2 धावा करू दिल्या. सुपर ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवने चौकार टोलावत टीम इंडियाचा विजय निश्चित केला. एकेकाळी श्रीलंकेला विजयासाठी 30 चेंडूत 30 धावा करायच्या होत्या. सामना श्रीलंका सहज जिंकेल असं वाटत असताना रिंकू सिंह, सूर्यकुमार यादव आणि रियान परागने श्रीलंकेला चितपट केले. 


भारताने पहिल्या डावात 137 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये शुभमन गिलने 37 चेंडूत 39 धावांची खेळी करत महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्याच्याशिवाय रियान परागने 26 आणि वॉशिंग्टन सुंदरने 25 धावांचे योगदान दिले. टीम इंडियासाठी कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अनुभवी संजू सॅमसन या सामन्यात काही खास दाखवू शकले नाहीत, तर यशस्वी जैस्वालही अवघ्या 10 धावा करून बाद झाला. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेचा संघ मैदानात उतरला तेव्हा पथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये 58 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली.


...अन् सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहचला


निसांका बाद झाल्यानंतर कुसल मेंडिस आणि कुसल परेरा यांनी कमान हाती घेतल्याने श्रीलंकन ​​संघासाठी विजय सोपा झाला. त्यांच्यातील 52 धावांच्या भागीदारीने भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले होते पण 16व्या षटकात रवी बिश्नोईने कुसल मेंडिसची विकेट घेत टीम इंडियाने सामन्यात पुन्हा चुरस आणली. पुढच्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरने वानिंदू हसरंगा आणि चारिथ असालंका यांना लागोपाठ दोन चेंडूत बाद करून दुहेरी धक्का दिला. श्रीलंकेला विजयासाठी 6 चेंडूत 6 धावा हव्या असताना सूर्यकुमार यादव गोलंदाजीसाठी आला आणि कमाल केली. फक्त 5 धावा देत सूर्यकुमारने 2 विकेट्स घेतल्या आणि सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहचला. 






सुपर ओव्हरचा थरार-


फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आला. पहिला चेंडू वाइड गेला. त्यानंतर एक धाव श्रीलंकेने काढली. वॉशिंग्टनने पुढी दोन्ही चेंडूत दोन विकेट्स घेतल्या. दुसऱ्या चेंडूवर  चेंडूवर कुसल परेरा आणि तिसऱ्या चेंडूवर पथुम निसांकाही बाद झाला. श्रीलंकेने सुपर ओव्हरमध्ये केवळ 2 धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी अवघ्या 3 धावा करायच्या होत्या. भारतासाठी सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.


संबंधित बातमी:


India vs Sri lanka: सूर्या-रिंकूची जोडी सुपरडुपर हिट; सामन्यात रंगला सुपरओव्हरचा थरार, फक्त एक चौकार अन् विषयच खल्लास; श्रीलंकेला घरच्या मैदानावर नमवलं