India vs Sri Lanka : भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सुरु टी20 मालिकेतील दुसरा सामना पुण्याच्या एमसीए ग्राऊंडवर खेळवला गेला. एका रंगतदार सामन्यात अखेर भारताला 16 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. सामन्यात श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत तब्बल 206 धावांचा डोंगर उभारला. ज्यानंतर 207 धावांचं आव्हान गाठण्यासाठी आलेल्या भारताने अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी दमदार अर्धशतकंही ठोकली, पण अखेर 190 धावाच भारत 20 ओव्हरमध्ये करु शकला आणि सामना भारताने 16 धावांनी गमावला. हा सामना सामना भारताने गमावल्यामुळे आता मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे.

Continues below advertisement


सर्वप्रथम सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रीलंका संघाची सुरुवातचांगली झाली. सलामीवीर पाथुम आणि कुसल यांनी अर्धशतकी भागिदारी पूर्ण केली.  कुसलला 52 धावांवर बाद होताच त्यानंतर श्रीलंकेचे काही विकेट्स स्वस्तात गेले. पाथुमनं 33 तर चरिथ असलंकाने 37 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण अखेरच्या षटकांमध्ये श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने अवघ्या 22 चेंडूत नाबाद 56 धावा करत एक धमाकेदार खेळी केली. ज्यामुळे श्रीलंका संघाने 20 षटकांत 6 गडी गमावत 206 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. भारताकडून उमरानने 3, अक्षरने 2 आणि चहलने 1 विकेट घेतली.


अक्षर-सूर्याची झुंज व्यर्थ


207 धावांचे तगडे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या भारताची सुरुवातच खराब झाली. पॉवरप्लेमध्ये तीन ओव्हरमध्ये भारताचे तीन गडी बाद झाले. ईशान किशन 2 राहुल त्रिपाठी आण शुभमन प्रत्येकी 5 धावा करुन तंबूत परतले. कॅप्टन पांड्या 12 आणि दीपक हुडा 9 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर सूर्यकुमार आणि अक्षर यांनी डाव सावरला. दोघांनी दमदार अशी अर्धशतकं झळकावली. पण सूर्या 51 धावा करुन बाद झाला. त्यानंतर शिवम मावीने अक्षरची साथ दिली. पण 26 धावाच मावी करु शकला, तर अक्षर 65 धावांची झुंज देऊ शकला. अखेर 20 षटकांत भारत 190 धावा करु शकल्याने सामना 16 धावांनी भारताने गमावला. 






हे देखील वाचा-