T20 World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान भारताचा युवा वेगवान गोलंदाज दीपक चाहरला पायाला दुखापत झाली. ज्यामुळं दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याला त्याला मुकावं लागलं होतं. एवढंच नाहीतर त्याची उर्वरित दोन्ही एकदिवसीय सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती पीटीआयनं बीसीसीआयच्या सुत्राच्या हवाल्यानं दिलीय. दीपक चाहरच्या दुखापतीनं भारतीय संघाचं टेन्शन वाढवलं आहे. भारताच्या टी-20 विश्वचषकाच्या संघात दीपक चाहरचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आलाय. 


टी-20 विश्वचषकापूर्वी भारताचं टेन्शन वाढलं
दीपकच्या पायाला दुखापत झाली आहे आणि त्यामुळंच तो पहिल्या एकदिवसीय सामन्याला मुकला आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या उर्वरित सामन्यात तो खेळू शकणार की नाही? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दीपकची दुखापत गंभीर झाल्यास त्याच्यासाठी तसेच भारतीय संघासाठी ही अत्यंत निराशाजनक बातमी असेल. कारण त्याचा स्टँडबाय म्हणून भारताच्या टी-20 विश्वचषक संघात समावेश करण्यात आला आहे


दीपक चाहरच्या पायाला दुखापत
पीटीआयनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार "दीपक चाहरचा सराव सत्रादरम्यान पाय मुरगळा आहे. परंतु, ही दुखापत तितकीसी गंभीर नाही. त्याला काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला जाऊ शकतो. त्यामुळं दीपक चाहरला खेळवण्याची जोखीम घ्यायची नाही नाही हा निर्णय संघ व्यवस्थापनाचा असेल." टी-20 विश्वचषकात दीपक चाहरची भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. गरज भासल्यास त्याला प्लेईंग इलेव्हनमध्येही खेळवलं जाणार असल्याचं बीसीसीआयनं आधीच स्पष्ट केलं आहे.


भारतीय संघ दुखापतीनं त्रस्त
भारतीय संघ आधीच दुखापतग्रस्त खेळाडूंच्या समस्येनं त्रस्त आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळं टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला असून त्याच्या पर्यायी खेळाडूची अद्याप घोषणा करण्यात आली नाही. बुमराहच्या जागी स्टँडबायवर असलेल्या मोहम्मद शमीचा भारतीय संघात समावेश केला जाईल, असं मानलं जातंय. दीपक चाहरही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. संघ व्यवस्थापन त्याच्या नावाचाही विचार करू शकते.


हे देखील वाचा-