India vs South Africa: बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर काल भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अखेरचा सामना खेळण्यात आला. परंतु, पावसामुळं हा सामना रद्द करण्यात आला. ज्यामुळं मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. या मालिकेत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) उत्कृष्ट कामगिरी केली. ज्यामुळं त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलंय. दरम्यान, सर्वाधिक वेळा मालिकावीराचा पुरस्कार जिंकणारा भुवनेश्वर कुमार पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरलाय.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भुवनेश्वर कुमारची भेदक गोलंदाजी
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत भुवनेश्वर कुमारनं भेदक गोलंदाजी केली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामीच्या अनुपस्थितीत त्यानं संघाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली. या मालिकेतील चार सामन्यात त्यानं सहा विकेट्स घेतले. या मालिकेतील चार सामन्यांमध्ये त्यानं 14.16 च्या सरासरीनं आणि 10.4 च्या स्ट्राईक रेटनं गोलंदाजी केली. भुवनेश्वर कुमारच्या दमदार प्रदर्शनामुळं त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
दुसऱ्यांदा मालिकावीर पुरस्कार जिंकणार पहिला भारतीय वेगवान गोलंदाज
भुवनेश्वर कुमारनं 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्याविरुद्ध मालिकावीरचा पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर नुकतीच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्यांदा मालिकावीराचा पुरस्कार जिंकला. महत्वाचं म्हणजे, टी-20 क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा सामनावीराचा पुरस्कार जिंकणार भुवनेश्वर कुमार पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरलाय. भुवनेश्वर कुमारनं अनेक सामन्यात भेदक गोलंदाजी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.
भुवनेश्वर कुमारची आतापर्यंतची कामगिरी
भुवनेश्वर कुमारनं तिन्ही फॉरमेटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये पाच विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज आहे. भुवनेश्वरनं भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये 63 विकेट्स, एकदिवसीय क्रिकटेमध्ये 141 विकेट्स आणि टी-20 मध्ये 64 विकेट्स घेतल्या आहेत.
हे देखील वाचा-