IND Vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग (Johannesburg) येथे सुरु आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं पारडं जडं दिसत आहे. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 122 धावांची गरज असून त्यांचे आठ विकेट्स शिल्लक आहेत. तर, हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या 8 विकेट्स मिळवाव्या लागतील, जे थोडं कठीण दिसत आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारानं चौथ्या दिवसासाठी भारताचा नेमका गेम प्लॅन काय असेल? हे सांगितलंय. 


जोहान्सबर्ग कसोटीत अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडूंनी बुधवारी अर्धशतकी खेळी साकारून स्वत:ची कारकीर्द वाचवण्यासह भारतालाही सावरलं. या सामन्यातील दुसऱ्या डावात अजिंक्य राहाणे 78 चेंडूंत 58 धावा आणि चेतेश्वर पुराजानं 86 चेंडूत 53 धावा केल्या. ज्यामुळं भारताला 266 धावांपर्यंत पोहचता आलं.


पत्रकारांशी बोलताना चेतेश्वर पुजारा म्हणाला की, ज्या खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणं थोडं कठीण असंत, तिथे फलंदाज म्हणून धावा करणे नेहमीच महत्वाचं असतं. भारतानं बोर्डावर लगावलेल्या धावांमुळं सामना बरोबरीत आहे. भारतीय गोलंदाजाला तिसऱ्या दिवशी विकेट्स घेता आल्या नाहीत. पण आम्ही या सामन्यात पुनरागमन करू. चौथ्या दिवशी ही खेळपट्टी गोलंदाजांना मदत करेल अशी आशा आहे, असं पुजारानं म्हटलंय.


चौथ्या दिवशीच सामन्याचा निकाल लागणार हे जवळपास स्पष्ट झाले असून आफ्रिका उर्वरित 122 धावा करणार की भारताचे गोलंदाज शिल्लक आठ विकेट्स घेऊन ऐतिहासिक मालिका विजयावर शिक्कामोर्तब करतील? हे पाहणे रंजक ठरेल.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha