IND vs SA 3rd T20I: सूर्यकुमार यादवच्या वादळी शतकी खेळीनंतर कुलदीप यादवच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने अखेरच्या टी 20 सामन्यात 106 धावांनी विजय मिळवला. कुलदीप यादवने आफ्रिकेच्या पाच फलंदाजांना तंबूत पाठवले. कुलदीप यादवच्या भेदक गोलंदाजीपुढे आफ्रिकेच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. निर्णायक टी 20 सामन्यात आफ्रिकेचा पराभव करत भारताने तीन सामन्याची मालिका 1-1 बरोबरीत सोडली. भारताच्या विजयात सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सूर्यकुमार यादवने झटपट शतक झळकावून भारतीय संघाला 200 चा टप्पा ओलांडून दिला आणि नंतर कुलदीप यादवने 5 विकेट घेत दक्षिण आफ्रिकेला 100 चा टप्पा ओलांडू दिला नाही.


भारताने दिलेल्या 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. Matthew Breetzke फक्त चार धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर आफ्रिकेच्या फलंदाजांना सामन्यात कमबॅक करताच आले नाही. दिग्गज फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतले. डेविड मिलरने सर्वाधिक धावा केल्या. मिलरने 25 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 35 धावांची खेळी केली. त्याशिवाय कर्णधार एडन माक्ररम याने 25 धावांचे योगादान दिले. त्याने तीन चौकार आणि दोन षटकार लगावले. Donovan Ferreira याने 12 धावा जोडल्या. या तीन फलंदाजांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या पार करता आली नाही.  हेंड्रिक्स याने आठ धावा केल्या. हेनरिक क्लासेन याला फक्त पाच धावा करत्या आल्या. 






भारताकडून कुलदीप यादव याने सर्वाधिक भेदक मारा केला. कुलदीप यादव याने 2.5 षटकात 17 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट घेतल्या. कुलदीप यादव याने आफ्रिकेची तळाची फलंदाजी तंबूत धाडली. रविंद्र जाडेजा याने दोन विकेट घेतल्या. जाडेजाने तीन षटकात 25 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंह यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.






दरम्यान, निर्णायक टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादवने शतकी खेळी केली. त्याशिवाय युवा यशस्वी जायस्वाल याने अर्धशतक ठोकले. दोघांच्या जिगरबाज खेळीच्या बळावर भारताने 20 षटकात सात विकेटच्या मोबदल्यात 201 धावांचा डोंगर उभारला. सूर्यकुमार यादव याने 100 तर यशस्वी जायस्वाल याने 60 धावांची खेळी केली. आफ्रिकेकडून विल्यमस आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.