न्यू चंदीगड : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी 20 सामना न्यू चंदीगड येथे 11 डिसेंबरला होणार आहे. कटक यथील पहिल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला 101 धावांनी पराभूत केलं होतं. यामुळं भारतीय संघात कोणतेही बदल होणार नाहीत अशा चर्चा आहेत. मात्र, संघात बदल होऊ शकतात असा देखील अंदाज वर्तवला जातोय.
भारतीय संघात बदल होणार?
भारताचा सलामीवीर, उपकॅप्टन शुभमन गिल आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव दोघेही फॉर्मसाठी संघर्ष करत आहेत. गोलंदाजीत अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी पहिल्या सामन्यात खराब फलंदाजी केली होती. त्यामुळं आफ्रिकेचे फलंदाज दुसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरतील. दक्षिण आफ्रिकेकडील क्विंटन डी कॉक आणि एडन मारक्रम यांच्यासारख्या अनुभवी फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल.
न्यू चंदीगड मधील परिस्थिती पाहता भारतीय संघात बदल होऊ शकतात. खेळपट्टी कोरडी असल्यास अर्शदीपच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळू शकते. याशिवाय हर्षित राणाला देखील संधी मिळू शकते.
न्यू चंदीगडमध्ये दवाचा परिणाम दिसण्याची शक्यता कमी आहे. या ठिकाणी आयपीएलमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं सहा वेळा विजय मिळवला, तर पाचवेळा पराभव झाला आहे. या मैदानावर 200 हून अधिक धावा झाल्या आहेत. तर, 111 धावांचा बचाव देखील करण्यात आला आहे. या खेळपट्टीवर गोलंदाजांचं वर्चस्व दिसून येतं.
भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कॅप्टन) तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर) हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह (कुलदीप यादव, हर्षित राणा)
दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य संघ : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर ) एडन मारक्रम (कॅप्टन), ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, डेविड मिलर, डॉनोवन फरेरा, मार्को यानसेन, लुथो सिपामला/ कॉर्बिन जोश/ जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, एनरिक नॉर्तजे
दरम्यान, कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेनं 2-0 अशी जिंकली. त्यानंतर झालेल्या वनडे मालिकेत भारतानं 2-1 असा विजय मिळवला. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका टी 20 मालिकेच्या निमित्तानं आमने सामने आले आहेत. यातील पहिली टी 20 मॅच भारतानं जिंकली आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कपची पूर्वतयारी म्हणून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका महत्त्वाची मानली जातेय. भारत दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत आघाडी भक्कम करणार का ते पाहावं लागेल.