IND vs SA 2nd T20 Live Score: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्यात पावसाने खोडा घातल्यामुळे खेळ थांबवावा लागलाय. त्याआधी रिंकू सिंह याने वादळी फलंदाजी केली. त्याशिवाय सूर्यानेही फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारताने 19.3 षटकात 7 बाद 180 धावा केल्या आहेत. रिंकू सिंह 68 धावांवर खेळत आहे. 


आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. भारताच्या दोन्ही सलामी फलंदाजांना खातेही उघडू दिले नाही. भारताची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. यशस्वी जायस्वाल आणि शुभमन गिल या युवा फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. मार्को यान्सन आणि विल्यम्स यांनी भारताला सुरुवातीला मोठा धक्का दिला. दोन विकेट झटपट गेल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि युवा तिलक वर्मा यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनीही चौफेर फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. तिसऱ्या विकेटसाठी सूर्या आणि तिलक वर्मा यांनी 49 धावांची भागिदारी केली. तिलक वर्मा 20 चेंडूत 29 धावा काढून तंबूत परतला. त्याने आपल्या खेळीत एक षटकार आणि चार चौकार ठोकले. तिलक बाद झाल्यानंतर सूर्याने रिंकूच्या मदतीने डाव सावरला. 


सूर्या आणि रिंकू यांनी झटपट धावा करत भारताची धावसंख्या वाढवली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. सूर्यकुमार यादव याने चौफेर फटकेबाजी करत आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेततला. रिंकू आणि सूर्या यांनी 48 चेंडूत 70 धावांची भागिदारी केली. सूर्याकुमार यादव याने 36 चेंडूमध्ये 56 धावांची खेळी केली. यामध्ये 3 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. सूर्या बाद झाल्यानंतर रिंकूने सर्व सुत्रे हाती घेतली. रिंकूने आफ्रिकेच्या गोलंदाजांच्या चिथड्या उडवल्या. रिंकूने 39 चेंडूमध्ये 68 धावांचा पाऊस पाडला. दोन षटकार आणि 9 चौकारांचा समावेश आहे. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा तो नाबाद होता. 


रिंकू आणि सूर्या ही जोडी फुटल्यानंतर इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. रविंद्र जाडेजाने थोडाफार संघर्ष केला. जाडेजाने 14 चेंडूत 19 धावांची खेळी केली. यामध्ये एक चौकार आणि एका षटकारांचा समावेश आहे. जितेश शर्मा याला फक्त एका धावेची खेळी करता आली नाही. अर्शदीप सिंह याला खातेही उघडता आली नाही. 


Gerald Coetzee  याने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने भारताच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. मार्को यान्सन आणि विल्यमसन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.  त्याशिवाय मार्करम आणि शम्सी यांनीही प्रत्येकी एका एका फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.