Ind vs SA, 1st Test : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs Sout Africa) यांच्यात सेंच्युरियन मैदानात (Centurion) रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला आहे. तब्बल 113 धावांनी भारताने ही कसोटी मारली असून या सामन्यात गोलंदाजांनी विशेष कामगिरी केली आहे. सामन्यात भारताकडून पहिल्या डावात केएल राहुलने ठोकलेलं शतक आणि संपूर्ण सामन्यात मोहम्मद शमीने टीपलेले 8 बळी महत्त्वाचे ठरले.



सामन्यात सर्वप्रथम भारताने प्रथम फलंदाजी करत राहुलचं शतक, अगरवालचं अर्धशतकाच्या जोरावर 327 धावा केल्या. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिका संघावर सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांनी दबदबा कायम ठेवला. 197 धावांवर भारताने आफ्रिकेला सर्वबाद करत सामन्यावरील पकड मजबूत केली. ज्यानंतर 130 धावांची आघाडी घेऊन भारताने दुसऱ्या डावाची फलंदाजी सुरु केली. पण भारताचा एकही फलंदाज खास कामगिरी करु शकला नाही. केवळ ऋषभ पंतने अखेरच्या काही षटकात 34 धडाकेबाज धावा केल्या. ज्याच्या जोरावर भारताने 174 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 305 धावांची आवश्यकता होती.


त्यानंतर दक्षिण आफ्रिका त्यांचा दुसरा डाव खेळत असताना भारतीय गोलंदाजांनी कसून गोलंदाजी केली. आफ्रिकेचे सुरुवातीचे फलंदाज भारताने तंबूत धाडले. पण सलामीवीर आणि कर्णधार डीन एल्गर हा टिकून खेळत असल्याने भारताचा विजय काहीसा लांबला. एल्गर 77 धावांवर बाद होताच नंतर एकही खेळाडू टिकू शकला नाही. ज्यामुळे सामना भारताने 113 धावांनी जिंकला. यावेळी भारताकडून मोहम्मद शमीने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 3 विकेट घेतल्या. तर बुमराहने पहिल्या डावात 2, दुसऱ्या डावात 3 आणि सिराजने पहिल्या डावात 1 तर दुसऱ्या डावात 2 विकेट मिळवल्या. तसंच शार्दूलने पहिल्या डावात 2 आणि आश्विनने दुसऱ्या डावात 2 विकेट खिशात घातल्या आहेत. 


भारताचा ऐतिहासिक विजय


सेन्चुरियन मैदानात भारताने मिळवलेला विजय हा ऐतिहासिक आहे. याचे कारण याआधी एकाही आशिया खंडातील संघाला सेन्चुरियन या दक्षिण आफ्रिकेच्या घरच्या मैदानात त्यांना मात देता आली नव्हती. तसंच आफ्रिकेची या ठिकाणी जिंकण्याती टक्केवारीही खूप होती, त्यांनी 26 पैकी 21 सामन्यात विजय मिळवला होता. ज्यानंतर आता भारताने हा विजय मिळवत इतिहास रचला आहे.  



खेळाडूंनी साजरा केला आनंद


या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार विराटसह सर्वच खेळाडूंना आनंद झाला असून सोशल मीडियावर सामन्यातील फोटो पोस्ट करत खेळाडूंनी आनंद साजरा केला आहे. विराट, पुजारा यांनी कू वर फोटो पोस्ट करत संघाचं अभिनंदन केलं आहे.


 







 







हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha