India vs New Zealand Semifinal : विश्वचषक 2023 अखेरच्या टप्प्यात पोहचला आहे. तीन सामन्यानंतर विश्वचषकाचा विजेता मिळणार आहे. क्रिकेटच्या महाकुंभातील पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये रंगणार आहे. उपांत्य फेरीसाठी आयसीसीने केलेला एक नियम भारतीय चाहत्यांचा आनंद द्विगुणित करणारा आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला तर रोहित शर्मा अॅण्ड कंपनीला फायनलचे तिकिट मिळणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना 15 नोव्हेंबर रोजी होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसरा सेमीफायनल 16 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दोन्ही सेमीफायनलसाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. साखळी फेरीत भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. पण किवीकडून कडवी टक्कर पाहायला मिळाली होती. त्यामुळे उपांत्य फेरीचा सामना रोमांचक होईल, यात शंकाच नाही.
उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस -
आयसीसीने उपांत्य फेरी आणि फायनलसाठी राखीव दिवस ठेवला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सेमीफायनल सामन्यात पावसाने खोडा घातला, तर सामना राखीव दिवशी म्हणजेच 16 तारखेला होईल. जर 16 तारखेलाही सामना झाला नाही.. तर गुणतालिकेत आघाडीवर असणाऱ्या संघाला विजयी घोषीत करण्यात येईल. म्हणजेच, मुंबईमध्ये दोन दिवस पावसामुळे सामना झाला नाही तर भारतीय संघ थेट फायनलमध्ये पोहचणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेमीफायनलसाठीही राखीव दिवस ठेवण्यात आलाय.
राखीव दिवशीही पाऊस आला तर...
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 15 नोव्हेंबर रोजी उपांत्य फेरीचा पहिला सामना होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यावर अद्याप तरी पावसाचे सावट नाही. पण पावसाने खोडा घातला तर राखीव दिवशी सामना होईल. पण 16 तारखेलाही पावसाने हजेरी लावली तर भारताला विजयी घोषीत करण्यात येईल.कारण, भारतीय संघ गुणतालिकेत न्यूझीलंडपेक्षा आघाडीवर आहे.गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानावर आहे तर न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर आहे.
पाहूयात भारताचा विश्वचषकातील प्रवास कसा राहिलाय..
8 ऑक्टोबर -
ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सने पराभव करत भारताने विश्वचषकाची दणक्यात सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 199 धावा केल्या होत्या. भारताने हे आव्हान चार विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. विराट कोहली आणि केएल राहुल यांनी शानदार खेळी केली होती.
11 ऑक्टोबर -
दिल्लीमध्ये झालेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा आठ विकेटने पराभव केला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी कताना 272 धावा केल्या. भारताने हे आव्हान दोन विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.
14 ऑक्टोबर -
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने पाकिस्तानचा सात विकेट्सने पारभव केला. पाकिस्ताने प्रथम फलंदाजी करताना 191 धावांपर्यंत मजल मारली. भारताने हे आव्हान तीन विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.
19 ऑक्टोबर -
पुण्यात भारताने बांगलादेशचा सात विकेट्सने पराभव केला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 265 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीच्या शतकाच्या बळावर भारताने हे आव्हान तीन विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.
22 ऑक्टोबर -
धरमशालाच्या मैदानात भारताने बलाढ्य न्यूझीलंडचा चार विकेट्सने पराभव केला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करातना 273 धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल भारताने हे आव्हान सहा विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.
29 ऑक्टोबर -
गतविजेत्या इंग्लंडला भारताने 100 धावांनी हरवले. भारताने प्रथम फलंदाजी करताना 229 धावांपर्यंत मजल मारली. भारताने गोलंदाजीत कमाल दाखवली. इंग्लंडला फक्त 129 धावांत बाद करत सहज विजय मिळवला.
2 नोव्हेंबर -
वानखेडे मैदानावर भारताने श्रीलंकेचा पालापाचोळा केला. भारताने लंकेला 302 धावांनी पराभव केले. भारताने प्रथम फलंदाजी करताना 357 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर लंकेला फक्त 55 धावांत गुंडाळले.
05 नोव्हेंबर -
बलाढ्या दक्षिण आफ्रिकेला भारताने 243 धावांनी हरवले. भारताने प्रथम फलंदाजी करताना 326 धावांचा डोंगर उभारला. विराट कोहलीने वनडेमधील 49 वे अर्धशतक ठोकले. प्रत्युत्तरदाखल आफ्रिकेचा संघ फक्त 83 धावांपर्यंत मजल मारु शकला.
12 नोव्हेंबर -
भारताने नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 410 धावांचा डोंगर उभरला. प्रत्युत्तरदाखल नेदरलँड्सचा संघ 250 धावांपर्यंत मजल मारु शकला.