Martin Guptill Injury Update: ICC 2021 T20 विश्वचषक स्पर्धेतील भारताचा पुढील सामना न्यूझीलंडसोबत रविवारी, 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्यापूर्वीच न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिलला पायाच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे भारताविरुद्ध खेळणे कठीण आहे. सूत्रांच्यानुसार, गुप्टिल या सामन्यात किवी संघाचा भाग असणार नाही. हे पाहता भारतासोबतच्या मोठ्या सामन्यात न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागू शकतो.


मंगळवारी शारजाच्या मैदानावर न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात गुप्टिलने 17 चेंडूंत 20 धावा केल्या. मॅचच्या पॉवर प्लेमध्ये हारिस रौफच्या चेंडूवर गुप्टिलच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानकडून पाच विकेटने पराभूत झाला.


सामन्यानंतर न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले, खेळाच्या शेवटी दुखापत झालेला गुप्टिल थोडा अस्वस्थ दिसत होता आणि आम्ही त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहोत. येत्या 24 ते 48 तासात दुखापतीबाबत सांगणे कठीण आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याला आधीच स्नायूंच्या समस्येमुळे दुखापत झाली आहे आणि त्यामुळेच तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही.


वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन या स्पर्धेतून बाहेर 
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का बसला होता. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन मंगळवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) तांत्रिक समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर त्याच्या जागी अॅडम मिल्नेचा 15 सदस्यीय संघात समावेश केला जाईल. न्यूझीलंड क्रिकेट (NZC) च्या मते, 30 वर्षीय फर्ग्युसनला सोमवारी रात्री सरावानंतर उजव्या वासरात दुखू लागले. यानंतर एमआरआय स्कॅन करण्यात आला, ज्यामध्ये दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. बोर्डाच्या म्हणण्यानुसार फर्ग्युसनला दुखापतीतून सावरण्यासाठी तीन ते चार आठवडे लागतील.


दोन्ही संघाला विजय आवश्यक


T20 विश्वचषकात (T20 WC) भारतीय संघ रविवारी न्यूझीलंडशी भिडणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकण्याच्या इराद्याने दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये उतरणार आहे. कारण टीमला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. विशेष म्हणजे पहिल्या सामन्यात न्यूझीलंडलाही पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. अशा स्थितीत दोन्ही संघ स्पर्धेतील पहिला विजय नोंदविण्याचा प्रयत्न करतील. हा सामना कोणताही संघ हरला तरी स्पर्धेतील पुढचा प्रवास खूप कठीण असेल.