IND vs NZ, 2nd Test, Wankhade Stadium: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव घोषित करून न्यूझीलंडला 540 धावांचे लक्ष्य दिलं. न्यूझीलंडला पहिल्या डावात अवघ्या 62 धावांवर गुंडाळल्यानंतर भारतानं 7 बाद 276 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंडच्या संघ डगमगताना दिसला. न्यूझीलंडनं तिसऱ्या दिवसाअखेर 62 & 140/5 धावा केल्या.


या कसोटीचा तिसऱ्या दिवशी भारतानं आज दुसऱ्या डावात बिनबाद 69 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. सलामीवीर मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारानं भारताला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या डावात शतक झळकवणाऱ्या मयंकनं दुसऱ्या डावातही अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी 107 धावा उभारल्या. मात्र, त्यानंतर एजाजनं चेतेश्वर पुजाराच्या रुपात भारताला पहिला झटका दिलाय. चेतेश्वर पुजारानं 47 धावा केल्या. त्यानंतर मयंक अग्रवालही 62 धावांवर असताना बाद झाला. दरम्यान, कर्णधार विराट कोहली आणि शुभमन गिलनं संघाचा डाव सावरला. कोहली आणि गिलनं अर्धशतकी भागिदारी केली. मात्र, रचिननं गिल पाठोपाठ विराटलाही माघारी धाडलं. त्यानंतर अक्षर पटेलनं आक्रमक फलंदाजी केली. त्यानं 26 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 41 धावांची खेळी केली. भारतानं आपला दुसरा डाव 70 षटकात 7 बाद 276 धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर 540 धावांचं लक्ष्य ठेवलं. न्यूझीलंडकडून एजाजनं 4 आणि रचिननं 3 विकेट्स घेतल्या आहेत. 





 


भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाची खराब सुरुवात झाली. आर अश्विननं सलामीवीर टॉम लॅथम आणि विल यंग यांना बाद केलं. त्यानंतर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर रॉस टेलर बाद झाला. मात्र, दुसरीकडं डॅरिल मिशेलनं संघाचा डाव सावरला आणि त्यानं 92 चेंडूत 60 धावा केल्या. परंतु, 35 व्या षटकात अश्विनच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. त्यानंतर टॉम ब्लंडल 37 व्या षटकात धावचीत झाला. तिसऱ्या दिवसाअखेर 140 धावा करून 5 विकेट्स गमावले आहेत. सध्या हेन्री निकोल्स (36) आणि रेचीन रवींद्र (2) मैदानावर उपस्थित आहेत. न्यूझीलंडच्या संघाला विजयासाठी 400 धावांची गरज आहे. तर, भारताला 5 विकेट्सची आवश्यकता आहे. दुसरा कसोटी सामना भारताच्या बाजूनं झुकलेला दिसत आहे. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-