IND vs NZ, 2nd ODI : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथे खेळवला जाणार आहे. पाहुण्या संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण मालिकेत टिकून राहण्यासाठी त्यांना कोणत्याही किंमतीवर विजय मिळवावा लागेल. त्याचबरोबर दुसरा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा इरादा असणार आहे. न्यूझीलंडचा संघ आजपर्यंत भारतात एकही एकदिवसीय मालिका जिंकू शकलेला नाही. त्यामुळेच आजचा हा सामना जिंकून किवीजना दमदार पुनरागमन करायला आवडेल. पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळू शकते. एकीकडे भारताला मालिकेत निर्णायक आघाडी मिळवायची आहे, तर न्यूझीलंड मालिका बरोबरीत आणण्यासाठी सर्व प्रयत्न करणार आहे. तर या महत्त्वूर्ण सामन्यात कोणते खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावू शकतात ते जाणून घेऊ...


विराट कोहली


या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. सध्या तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या एका महिन्यात त्याने वनडेत तीन शतकं झळकावली आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात लवकर बाद झालेल्या कोहलीकडून दुसऱ्या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

शुभमन गिल


न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात द्विशतक झळकावणारा शुभमन गिल चांगलाच चर्चेत आहे. गेल्या काही काळापासून त्याची वनडेतील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण करणारा तो भारताचा पहिला फलंदाज आहे. शुभमनने सलग दोन सामन्यात दोन शतकं झळकावली आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याला पुन्हा एकदा संस्मरणीय कामगिरी करायची आहे.

मायकेल ब्रेसवेल


पहिल्या सामन्यात आक्रमक फलंदाजी करताना मायकल ब्रेसवेलने भारतीय संघाला तणावात आणलं होतं. स्फोटक फलंदाजी करताना 78 चेंडूत 140 धावांची तुफानी खेळी त्याने केली. त्याच्या खेळीमुळेच न्यूझीलंडला 350 धावांचे लक्ष्य आरामात गाठता येईल असे वाटत होते. अखेरच्या षटकात ब्रेसवेल बाद झाल्यानंतर भारताला जीवदान मिळालं. पण ब्रेसवेल त्याच्या संघासाठी करो किंवा मरोच्या सामन्यात निर्णायक भूमिका बजावू शकतो.

डेव्हॉन कॉन्वे


भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डेव्हॉन कॉन्वे ही महत्त्वाची कामगिरी करु शकतो. पहिल्या सामन्यात 10 धावांवर बाद झालेल्या कॉन्वेला दुसऱ्या सामन्यात मोठी खेळी खेळायची आहे. पाकिस्तान दौऱ्यावर त्याने न्यूझीलंडला मालिका जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या मालिकेत कॉन्वेने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलं होते. भारताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल

हे देखील वाचा-