IND Vs ENG Women :  भारतीय महिला संघाच्या युवा खेळाडूंच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इंग्लंडविरुद्धचा एकमेव कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात भारताला यश आलं. चौथ्या दिवशी स्नेह राणाच्या नाबाद 80 आणि तानिया भाटियाच्या नाबाद 44 धावांच्या खेळीमुळे सामना अनिर्णित राखला. तर शेफाली वर्माला तिच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर तिला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. शेफालीने पहिल्या डावात 96 तर दुसऱ्या डावात 63 धावांची खेळी केली.


नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 9 बाद 396 धावांवर आपला डाव घोषित केला. त्यानंतर टीम इंडिया पहिल्या डावात 231 धावांवर बाद झाली. यामुळे इंग्लंडला 165 धावांची मोठी आघाडी मिळाली आणि इंग्लंडने भारताला फॉलोऑन दिला. त्यानंतर अखेरच्या दिवशी दुसर्‍या डावात भारतीय संघाने चांगली कामगिरी दाखवत सामना अनिर्णित राखला.


दुसर्‍या डावात टी टाईमपर्यंत भारतीय संघाने 8 बाद 243 धावा केल्या होत्या. इंग्लंडला जिंकण्यासाठी फक्त दोन विकेट्स हव्या होत्या. त्यामुळे भारताचा पराभव जवळपास निश्चित होता. पण अखेरच्या सत्रात स्नेह राणा आणि तानिया भाटियाने जबरदस्त फलंदाजी करत सामना अनिर्णीत राखला.  भारताने 8 बाद 344 धावा करुन भारताने सामना वाचवला.


युवा खेळाडूंची जबरदस्त कामगिरी



  • स्नेह राणा              80 धावा, 13 चौकार

  • तानिया भाटिया      44 धावा, 6 चौकार

  • शेफाली वर्मा         63 धावा, 11 चौकार

  • दीप्ति शर्मा           54 धावा, 8 चौकार

  • पूनत राउत           39 धावा, 5 चौकार


दरम्यान, भारतीय महिला क्रिकेट टीम सात वर्षांनंतर कसोटी सामने खेळण्यासाठी मैदानावर उतरली होती. तथापि, भारतीय महिला क्रिकेट संघ आता कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहे. यावर्षी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातही पिंक बॉल टेस्ट देखील खेळली जाणार आहे.