WTC 2021 Live Updates : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आज सुरु झाला आहे. काल पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे पाण्यात गेल्याने भारत आणि न्यूझीलॅंड यांच्यातील सामन्याला आजपासून सुरुवात झाली.न्यूझीलॅंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून रोहित आणि शुभमन गिलनं चांगली सुरुवात करुन दिली. मात्र काल पावसामुळं दिवस वाया गेल्यानंतर आजही अंधूक प्रकाशामुळे खेळात व्यत्यय आला. भारताने दुसऱ्या दिवसअखेर 64.4 षटकात 3 विकेट्स गमावत 146 धावा केल्या आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे अर्धशतकी भागीदारी रचत मैदानात आहेत. 


रोहित आणि शुभमन गिलकडून आश्वासक  सुरुवात
भारताचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाची आश्वासक सुरुवात केली. 61 धावांवर रोहित 34 धावांवर बाद झाला.  काईल जेमीसनने रोहितला बाद केले.  रोहित बाद झाल्यानंतर लगेच नील वॅग्नरने शुभमनला बाद केले. शुभमनने 28 धावा केल्या. यानंतर चेतेश्वर पुजारा 8 धावांवर बाद झाला. पुजारानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेसह विराटने भारताला शतकी पल्ला गाठून दिला. तिसऱ्या सत्रानंतर अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर पुन्हा खेळ सुरु झाला. मात्र  46 व्या षटकात अंधूक प्रकाशामुळे खेळ पुन्हा थांबवण्यात आला. विराट कोहली 44 तर अजिंक्य 29 धावांवर नाबाद आहेत. 


महान धावपटू मिल्खा सिंह यांना टीम इंडियाकडून आदरांजली
फायनल सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांना आदरांजली म्हणून टीम इंडियानं हे पाऊल उचललं आहे.  मिल्खा सिंह यांचं शुक्रवारी कोरोनामुळं वयाच्या 91व्या वर्षी निधन झालं.  आज संध्याकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारताच्या या महान खेळाडूला टीम इंडियानं अनोखी श्रद्धांजली वाहिली.


कसोटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा पहिला दिवस 'पाण्यात'!
साऊदम्पटनमधील हॅम्पशायर बाऊलच्या मैदानात हा सामना खेळवला  जात आहे. मात्र पहिल्या दिवशी साऊदम्पटनमध्ये पाऊस झाल्यानं क्रीडा प्रेमींची निराशा झाली.  पावसाच्या बॅटिंगमुळे पहिल्या दिवसाचा खेळ पूर्णपणे वाया गेला. पावसामुळे आणि आऊट फिल्डवर पावसाचे पाणी असल्याने सामना खेळला गेलाच नाही.पंचांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर सामना सुरू करणे शक्य होणार नसल्याचे सांगितलं. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला होता. 


टीम इंडिया तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात 
कोणता संघ या सामन्याचं जेतेपद पटकावेल आणि 'जगात भारी' ठरेल, असे प्रश्न अनेक क्रीडारसिकांच्या मनात घर करुन आहेत. हा सामना भारतीय संघानं जिंकल्यास विराट कोहली याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाच्या वाट्याला आलेलं हे मोठं यश ठरणार आहे. बीसीसीआयने सामन्याच्या एक दिवस आधी अंतिम सामन्यात भाग घेणार्‍या 11 खेळाडूंची घोषणा केली.अंतिम सामन्यात भारताने तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.