IND Vs ENG Women : इंग्लंडच्या विरोधात खेळवण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेच्या शेवटच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं इतिहास रचला आहे. 75 धावांची नाबाद खेळी करणारी मिताली राज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला खेळाडू बनली आहे. एवढचं नाहीतर मिताली राजने सलग तिसरं अर्धशतक लगावत भारतीय महिला क्रिकेट संघाला चार विकेट्सनी विजय मिळवून दिला आहे.
38 वर्षांची मितालीनं आपल्या या खेळीत 11 धावा केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनली आहे. मितालीनं इंग्लंडच्या चार्लोट एडवडर्सला मागे टाकलं आहे. चार्लोट एडवडर्सच्या नावे 10273 धावांचा विक्रम आहे. आपल्या या विक्रमासह मिताली राज क्रिकेटच्या तिनही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. या यादीत न्यूझीलंडची सूजी बेट्स 7849 धावांसह तिसऱ्या स्थानी आहे.
मिताली राज फॉर्मात
इंग्लंडच्या विरोधात खेळवण्यात आलेल्या सीरिजमध्ये मिताली राजनं उत्कृष्ट खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. तिनही सामन्यांमध्ये मिताली राजनं अर्धशतक केलं आहे. संपूर्ण मालिके दरम्यान, मिताली राज एका वळणावर अत्यंत मजबुतीनं उभी राहिली.
मिताली राजनं पहिल्या वनडेमध्ये 72 धावा केल्या. दुसऱ्या वनडेमध्ये मिताली राजनं 59 धावांची खेळी केली. तर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 75 धावांची खेळी करुन संघाचा क्लीन स्वीप होण्यापासून बचाव केला आहे. मिताली राज या सीरिजमधील सर्वाधिक धावा, सर्वाधिक अर्धशतकं आणि सर्वाधिक चौकार लगावणारी खेळाडू आहे.
दरम्यान, 16 वर्षांच्या वयात डेब्यू करणारी मिताली राजनं काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 वर्ष पूर्ण केले आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त 22 वर्षांपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारी मिताली दुसरी खेळाडू आहे.