IND vs ENG Semi Final 2024 T20 World Cup : टी20 विश्वचषकात रनमशीन विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. किंग विराट कोहली याच्यावर नेटकऱ्यांकडून टीका होत आहे. विराट कोहलीला संघाबाहेर ठेवायला हवं, असा सल्लाही काही नेटकऱ्यांकडून दिला जातोय. विराट कोहलीऐवजी यशस्वी जायस्वाल याला संधी द्यायला हवी, असाही एकाबाजूने सूर आलेला आहे. विराट कोहलीच्या फ्लॉप कामगिरीचा फटका टीम इंडियाला बसू नये, त्याऐवजी युवा यशस्वीला संघात स्थान द्यायला हवं. यशस्वी जायस्वाल याला प्लेईंग 11 मध्ये खेळवण्याचा बोल्ड निर्णय रोहित शर्मा घेणार का? सहा सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवलाय, अजेय असणाऱ्या संघात रोहित शर्मा बदल कऱणार काय़ ? याकडेही चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. 


यशस्वी जायस्वाल यानं अल्पवधीतच आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावीत केलेय. आयसीसी क्रमवारीत यशस्वी जायस्वाल सध्या सातव्या क्रमांकावर आहे. प्रतिभा असतानाही यशस्वीला संघाबाहेर बसावं लागत आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी कऱणाऱ्या विराट कोहलीला विश्वचषकात सलामीला उतरवले, त्यामुळे यशस्वी जायस्वाल याला स्थान मिळाले नाही. पण विराट कोहलीला सलामीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याच्याकडून सुरुवातही अतिशय चाचपड होताना दिसत आहे, जम बसल्यानंतरही विराट कोहलीने विकेट फेकली. बांग्लादेश आणि अफगाणिस्तानविरोधात विराट कोहलीला चांगली सुरुवात मिळाली होती. त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात होती. पण त्याचवेळी विराट कोहली बाद झाला. मोक्याच्या क्षणी विराट बाद झाल्याचा फटका संघाला आतापर्यंत बसला नाही. पण आता नॉकआऊट सामने आहेत. त्यामध्ये एक चूकही महागात पडू शकते. त्यामुळे मोक्याच्या सामन्यात रोहित शर्मा काय निर्णय घेणार... अनुभवी विराट कोहली यालाच संधी दिली जाणार का? की युवा यशस्वी जायस्वाल याच्यासोबत जाणार? याचं उत्तर गुरुवारीच मिळेल. भारतीय चाहत्यांना नेहमीच विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. पण विश्वचषकात विराट कोहलीला अद्याप लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे मोक्याच्या सामन्यात विराटकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होतेय. 


यशस्वी जायस्वाल पदार्पणासाठी सज्ज


यशस्वी जायस्वाल याची विश्वचषकासाठी 15 जणांच्या चमूमध्ये निवड झाली. आतापर्यंत टीम इंडियाचे सहा सामने झाले आहेत. या सामन्यात यशस्वी जायस्वाल याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले नाही. यशस्वी जायस्वालने 16 टी20 सामन्यात 502 धावा केल्या आहेत. त्यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकाचा समावेश आहे. त्याचा स्ट्राईक रेट 162 इतका जबरदस्त आहे. यशस्वी जायस्वाल टी20 विश्वचषकात पदार्पणासाठी सज्ज आहे. त्याला अद्याप संधी मिळालेली नाही... अखेरच्या दोन सामन्यात त्याला संधी मिळणार का? याची चर्चा सुरु आहे.


विराट कोहली विश्वचषकात फ्लॉप - 


रनमशीन विराट कोहलीला विश्वचषकात अद्याप एकही अर्धशतक ठोकता आलेले नाही. टी20 विश्वचषकातील 6 सामन्यानंतरही विराटच्या बॅटमधून एकही मोठी खेळी निघालेली नाही. यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 37 इतकी आहे, ती खेळी अफगाणिस्तानविरोधात होती. बांगलादेशविरोधात फक्त 24 धावा काढता आल्या होत्या. साखळी सामन्यात विराट कोहलीला दुहेरी धावसंख्या गाठता आली नव्हती. पाकिस्तानविरोधात विराट कोहलीला फक्त चार धावाच काढता आल्या होत्या. तर अमेरिकाविरोधात विराट खातेही उघडता आले नव्हते. सुपर 8 मधील ऑस्ट्रेलियाविरोधात विराट कोहली शून्यावर तंबूत परतला होता. विराट कोहलीची खराब कामगिरी पाहून क्रिकेट चाहत्यांकडून निराशा व्यक्त करण्यात येत आहे. विराट कोहलीला अद्याप सूर गवसलेला नाही. नॉकआऊट सामन्यात तरी विराट कोहलीची बॅट चालेल का? असा सवाल उपस्थित होतोय.