IND vs ENG, Sarfaraz Khan : टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका (Five Match Test Series) खेळवण्यात आली. या कसोटी मालिकेतून टीम इंडियाचे धुरंधर असलेले अनेक दिग्गज वेगवेगळ्या कारणांसाठी बाहेर होते. अशातच टीम इंडियात काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली. सरफराज खान (Sarfaraz Khan) यानं आपल्या पदार्पणातच दमदार खेळी करत आपली छाप सोडली. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत सरफराजनं तीन अर्धशतकं झळकावली. 


सरफराज त्याच्या डेब्यू सामन्यापासूनच चर्चेत होता. अशातच संपूर्ण मालिकेपैकी सरफराज तीन कसोट्या खेळला आणि त्यानं आपल्या दमदार खेळीनं आपली दखल घेण्यास भाग पाडलं. अशातच इंग्लंडविरोधातील रांची कसोटीतील एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा सरफराजवर रागावताना दिसत आहे. 


आता सर्वांना प्रश्न पडलेला की, असं काय झालं की, रोहित शर्मा सरफराजवर चिडला. खरं तर रोहितचं रागावणं अगदी बरोबर होतं. कारण, सरफराज हेल्मेट न घालता अगदी क्लोज-इन-पोजिशनवर उभा होता. रोहितनं ते पाहिलं आणि सरफराजला चांगलंच फैलावर घेतलं. "ओए, हिरो नहीं बनने का", असं म्हणत रोहितनं सरफराजला हेल्मेट घालायला लावलं. 






"अरे हिरो व्हायचं नाही"


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा युवा फलंदाज सरफराज खानला इशारा देत आहे. व्हिडीओमध्ये रोहित शर्मा सरफराज खानला म्हणतो की, "अरे हिरो व्हायचं नाही." यानंतर कॉमेंट्री करत असलेल्या दिनेश कार्तिकनं संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. दिनेश कार्तिकनं सांगितलं की, रोहित शर्मा सरफराज खानला असं का म्हणाला? खरंतर सरफराज खान हेल्मेटशिवाय शॉर्ट फिल्डिंग करत होता, पण सरफराज खाननं कोणतीही रिस्क घेऊ नये, अशी रोहित शर्माची इच्छा होती.


रांची कसोटीत हा किस्सा घडला पण रोहितनं सांगितलेली गोष्ट सरफराजनं लक्षात ठेवली आणि त्यानंतरच्या कसोटीतही ती कटाक्षानं पाळली. जेव्हा जेव्हा सरफराज क्लोज-इन-पोजिशनवर फिल्डिंगसाठी उभा राहिल्याचं पाहायला मिळालं, तेव्हा तेव्हा सरफराजनं हेल्मेट घातलं होतं. 


रोहितचा सल्ला ऐकला म्हणूनच सरफराज बचावला 


सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, रोहितचा सल्ला ऐकणं सरफराजसाठी खरंच खूप फायद्याचं ठरलं. इंग्लंडविरोधातील धर्मशाला कसोटीत सरफराज खानला गंभीर दुखापत झाली असती, पण रोहितनं दिलेला सल्ला लक्षात ठेवून सरफराज हेल्मेट घालून फिल्डिंग करत होता. 






नेमकं काय घडलं? 


धर्मशाला कसोटीत इंग्लंडच्या दुसऱ्या डावात कुलदीपचा चेंडू टोलावत बशीरनं शॉट मारला, जो थेट सरफराजच्या हेल्मेटवर जाऊन लागला होता. पण नशीबानं सरफराजनं हेल्मेट घातलं होतं. जर सरफराजनं हेल्मेट घातलेलं नसतं, तर मात्र त्याला गंभीर दुखापत झाली असती. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.