IND vs ENG 5th T-20 : नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या टी-20 सामन्यात भारताने इंग्लंडला पराभूत केलं. यासह पाच सामन्यांची मालिका 3-2 अशी जिंकली. टी -20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा हा सलग सहावा मालिका विजय आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 2 गडी बाद 224 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ निर्धारित षटकांत 8 गडी राखून 188 धावा करू शकला. या सामन्यात अनेक मोठ्या रेकॉर्ड्सची नोंद झाली.


कर्णधार म्हणून विराट कोहलीने इतिहास रचला


या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने 52 चेंडूत नाबाद 80 धावांची नाबाद खेळी केली. यासह तो टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. या फॉरमॅटमध्ये विराटने कर्णधार म्हणून आता 1,502 धावा केल्या आहेत. विराटने ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार अॅरॉन फिंचला मागे टाकल आहे. फिंचने कर्णधार म्हणून 44 सामन्यांत 1462 धावा केल्या आहेत.


कोहली मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला


या मालिकेत विराट कोहलीने सर्वाधिक 231 धावा केल्या. यासह तो द्विपक्षीय टी -20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम केएल राहुलच्या नावावर होता.


भारताचा सलग सहावा मालिका विजय


टीम इंडियाचा टी -20 क्रिकेटमधील हा सलग सहावा मालिका विजय आहे. यापूर्वी टीम इंडियाने टी -20 मालिकेत वेस्ट इंडिज, बांगलादेश, श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्याचबरोबर गेल्या 9 मालिकेत भारत अजिंक्य ठरला आहे. टीम इंडियाचा टी -20 मालिकेत शेवटचा पराभव फेब्रुवारी 2019 मध्ये झाला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने पराभूत केले होते. ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या टी -20 मालिकेत भारताला क्लीन स्वीप दिला होता.


डेव्हिड मलानने इतिहास रचला


46 चेंडूत 68 धावांची शानदार खेळी खेळणार्‍या डेव्हिड मलानने टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मोठा विक्रम नोंदवला आहे. आंतरराष्ट्रीय टी -20 सामन्यांमध्ये मलान सर्वात वेगवान 1000 धावा पूर्ण करणारा फलंदाज बनला आहे. 24 व्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. पूर्वी हा विक्रम पाकिस्तानी कर्णधार बाबर आजमच्या नावावर होता. बाबरने 26 सामन्यात हा पराक्रम केला होता.


रोहित शर्माची मोठी कामगिरी
 
रोहित शर्माने या सामन्यात 34 बॉलमध्ये 64 धावांचे तुफानी खेळी केली. यासह त्याने टी -20 आंतरराष्ट्रीयमध्ये 2,864 धावा पूर्ण केल्या आहेत. तसेच या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणार रोहित जगातील दुसर्‍या क्रमांकाचा खेळाडू बनला आहे. या यादीमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. कोहलीच्या नावावर 3000 हून अधिक धावा आहेत. 


या सामन्यात रोहितने चार चौकार आणि पाच षटकार लगावले. टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात रोहितने पाच किंवा अधिक षटकार ठोकण्याची ही 10 वी वेळ आहे. यासह अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू बनला आहे.


टीम इंडियाचा 36 धावांनी विजय


पाचव्या टी -20 सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने 20 षटकांत दोन बाद 224 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ निर्धारित षटकांत 8 गडी राखून 188 धावा करू शकला. भारताकडून रोहित शर्माने 64, विराट कोहलीने नाबाद 80, सूर्यकुमार यादव 32 आणि हार्दिक पांड्याने नाबाद 39 धावा केल्या. त्याचवेळी इंग्लंडकडून डेव्हिड मालनने सर्वाधिक 68 आणि जोस बटलरने 52 धावा केल्या. चार षटकांत अवघ्या 15 धावा देत दोन विकेट घेणारा भुवनेश्वर कुमार सामनावीर ठरला.