IND vs ENG 4th Test Match, Day4: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर खेळली जात आहे. शार्दुल ठाकूर आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने इंग्लंडविरुद्ध रविवारी चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात 466 धावा केल्या. टीम इंडियाने 367 ची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने इंग्लंड समोर आता विजयासाठी 368 धावांचं टार्गेट ठेवलं आहे. शार्दुल ठाकूरने 60 धावा तर ऋषभ पंतने 50 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. 


शार्दुल ठाकूरने 72 चेंडूत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 60 धावा आणि ऋषभ पंतने 106 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने तीन, ओली रॉबिन्सन आणि मोईन अलीने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर जेम्स अँडरसन, कर्णधार जो रूट आणि क्रेग ओव्हरटन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात चमकदार कामगिरी केली. 


याआधी, भारताने शनिवारी तीन विकेट गमावत 270 केल्या होत्या. रविवारी यापुढे खेळण्यास टीम इंडियाने सुरुवात केली. विराट कोहलीने 37 चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने 22 धावा आणि रवींद्र जडेजाने 33 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने नऊ धावा केल्या. आज यापुढे खेळाला सुरुवात झाली. मात्र रवींद्र जाडेजा फार काळ टिकू शकला नाही आणि तीन चौकारांच्या मदतीने 59 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. ख्रिस वोक्सने त्याला बाद केले.


जाडेजा बाद झाल्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे फलंदाजीसाठी आला आणि तो खाते न उघडता ख्रिस वोक्सने त्याची विकेट घेतली. रहाणे बाद झाल्यानंतर ऋषभ पंत मैदानात उतरला. विराट कोहलीसह मिळून त्यांने टीम इंडियाचा डाव पुढे नेला. लंच ब्रेकच्या अगदी आधी कर्णधार विराट कोहली बाद झाला. मोईन अलीने कोहलीला माघारी धाडलं. कोहलीने 96 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने 44 धावा केल्या.