India vs Bangladesh : यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत दोन मोठे उलटफेर झाले आहेत. अफगाणिस्तान संघाने गतविजेत्या इंग्लंडचा तर नेदरलँड संघाने दक्षिण आफ्रिकाचा पराभव करत खळबळ माजवली. आता आज भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सामना होत आहे. टीम इंडिया बांगलादेशला हलक्यात घेणार नाही. भारतीय संघाला माजी दिग्गजांकडूनही तसाच सल्ला दिला जातोय. त्याला कारणही तसेच आहे, 2007 च्या विश्वचषकात भारतीय संघाला बांगलादेशने पराभवाचा धक्का दिला होता. बांगलादेशच्या भेदक माऱ्यापुढे भारताची तगडी फलंदाजी ढेपाळली होती. त्यानंतर या स्पर्धेतील भारताचे आव्हानही संपुष्टात आले होते. राहुल द्रविड त्यावेळी टीम इंडियाचा कर्णधार होता. आता तो कोच आहे. राहुल द्रविड 2007 विश्वचषकातील पराभव विसरलेला नसेल.
राहुल द्रविडच्या नेतृत्वातील टीम इंडिया 2007 विश्वचषकात दावेदार म्हणून उतरला होता. पण भारताला मोठा धक्का बसला होता. कर्णधार राहुल द्रविड याने बांगलादेशविरोधात प्रथम फलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला होता. पण बांगलादेशच्या गोलंदाजीसमोर आपली फलंदाजी ढेपाळली होती. 49.3 षटकात संपूर्ण संघ 191 धावांत तंबूत परतला होता. युवराज सिंह याने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली होती. त्याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. एमएस धोनीसह तीन फलंदाज खातेही न उघडता बाद झाला होते. बांगलादेशचा अनुभवी गोलंदाजी मशरफे मुर्तजा याने चार विकेट घेतल्या होत्या. त्याशिवाय अब्दुर रज्जाक आणि मोहम्मद रफीक यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या होत्या. मुर्तजा याने 9.3 षटकात 38, रज्जाकने 10 षटकात 38 आणि रफीकने 10 षटकात 35 धावा खर्च केल्या होत्या.
192 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने दमदार सुरुवात केली होती बांगलादेशने हे आव्हान 5 विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले होते. बांगलादेशकडून मुश्फिकुर रहीमने नाबाद 56 धावांची खेळी केली होती. त्याशिवाय शाकिब अल हसन यानेही 53 धावा चोपल्या होत्या. सलामी फलंदाज तमीम इकबाल याने 51 धावांचे योगदान दिले होते. बारातकडून वीरेंद्र सहवाग आणि मुनाफ पटेल यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या होत्या. तर झहीर खान याने एक विकेट घेतली होती.
2007 च्या सामन्यात दमदार कामगिरी करणारे शाकीब अल हसन आणि मुश्फिकुर सध्याही बांगलादेश संघाचे सदस्य आहेत. दोघेही फॉर्मात आहेत. शाकीब तर सध्या भारताचा कर्णधार आहे. त्यामुळे बांगलादेश संघाला टीम इंडियाने हलक्यात घेऊ नये.
2007 चा विश्वचषक भारतासाठी खराब -
2007 चा विश्वचषक भारतासाठी अतिशय खराब राहिला होता. साखळी फेरीत भारताला तीन पैकी दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. बांगलागदेश आणि श्रीलंका या संघाकडून भारतीय संघाचा पराभव झाला होता. राहुल द्रविडच्या नेतृत्वातील भारतीय संघाने बरमूडाला 257 धावांनी हरवले होते. साखळी फेरीतच भारताचा गाशा गुंडाळला होता.