IND vs BAN 3rd T20 : टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात हैदराबादमध्ये तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांनी हैदराबादच्या स्टेडियममध्ये धुमाकूळ घातला. डावाच्या तिसऱ्याच षटकात अभिषेक शर्माच्या रूपाने टीम इंडियाने पहिली विकेट लवकर गमावली, पण त्यानंतर संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांनी कमान सांभाळली. भारतीय संघाने बांगलादेशला तिसरा टी-20 सामना जिंकण्यासाठी 298 धावांचे मोठे लक्ष्य दिले आहे. दरम्यान, भारतीय खेळाडूंनी 25 चौकार आणि 22 षटकार मारले.


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली आणि त्यांच्या टी-20 इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या केली. भारताकडून संजू सॅमसनने शतक झळकावले, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावले. सॅमसनने अवघ्या 40 चेंडूत शतक झळकावले, जे या फॉरमॅटमधील भारताचे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. सॅमसनने कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत दुसऱ्या विकेटसाठी 173 धावांची भागीदारी केली.


केवळ सॅमसन आणि सूर्यकुमार यांच्या खेळीच्या जोरावर भारताला एवढी मोठी धावसंख्या गाठण्यात यश आले. अभिषेक शर्मा लवकर बाद झाल्यानंतर सॅमसन आणि सूर्यकुमार यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांना वेठीस धरले आणि आक्रमक फलंदाजी केली. सॅमसन 47 चेंडूंत 11 चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने 111 धावा करून बाद झाला, तर सूर्यकुमार 35 चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 75 धावा करून बाद झाला. सॅमसन आणि सूर्यकुमार बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि रायन पराग यांनी भागीदारी रचली आणि अवघ्या 26 चेंडूत 70 धावा जोडून भारताची धावसंख्या 300 च्या जवळ नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.






भारताकडून सॅमसन आणि सूर्यकुमार व्यतिरिक्त हार्दिकने 18 चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 47 धावा केल्या, तर रायनने 13 चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 34 धावा केल्या. रिंकू सिंग चार चेंडूत एका षटकाराच्या मदतीने आठ धावा करून नाबाद माघारी परतला आणि वॉशिंग्टन सुंदरही एक धाव घेत नाबाद माघारी परतला. बांगलादेशकडून तनझिम हसन शाकिबने चार षटकांत 66 धावा देत तीन बळी घेतले, तर तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान आणि महमुदुल्लाह यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.


हे ही वाचा -


Sanju Samson Century : 11 चौकार 8 षटकार; संजू सॅमसने वात पेटवली, बांगलादेशविरुद्ध ठोकलं विक्रमी शतक!