IND vs BAN 2nd ODI: ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला बांगलादेशकडून (India vs Bangladesh) पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारतीय संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 नं पिछाडीवर गेला. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारताला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं गरजेचं होतं. परंतु, बांगलादेशच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. अखेरच्या काही षटकात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दुखापतग्रस्त रोहित शर्मानं सामना फिरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारताला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाकडून नेमकं कुठं चूक झाली? ज्यामुळं भारताला मालिका गमवावी लागली. दरम्यान, भारताच्या पराभवाच्या पाच प्रमुख कारणांवर एक नजर टाकुयात.
1) महेंदी हसन मिराजची आणि महमुदुल्लाह महत्त्वपूर्ण भागिदारी
नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजीसाठी मैदानात आलेल्या बांगलादेशच्या संघानं अवघ्या 69 धावांवर 6 विकेट्स गमावले. त्यावेळी भारत बांगलादेशला 100 धावांच्या आत गुंडाळेल, असं वाटत होतं.पण महमुदुल्लाह आणि मेहंदी मिराजनं 148 धावांची भागिदारी रचत बांगलादेशच्या संघाची धावसंख्या 250 पार पोहचवण्यात मदत केली.
2) मेहंदी हसन मिराजची शतकी खेळी
पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर दुसऱ्या सामन्यात मेहंदी हसन मिराज भारतासाठी विलन ठरला. संघाची दयनीय अवस्था असताना तो फलंदाजीला आला होता. पण त्यानंतर त्यानं संयमी खेळी दाखवत शतक झळाकवलं आणि संघाची धावसंख्या 271 धावांवर पोहचवली. मेहंदी हसन मिराजची विकेट घेण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले.
3) भारताच्या फलंदाजीची खराब सुरुवात
बांगलादेशनं दिलेल्या 272 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय खराब झाली.भारताच्या डावातील दुसऱ्या षटकात विराट कोहली आणि तिसऱ्या षटकात शिखर धवन बाद झाले. या सामन्यात विराट कोहली सलामीला आला, पण त्याला फक्त 5 धावाच करता आल्या.कोहलीनंतर शिखर धवनही सहा धावा करून माघारी परतला. ज्यामुळं बांगलादेशचा संघ भारतीय संघावर दबाब निर्माण करण्यात यशस्वी ठरला.
4) भारताची फलंदाजी ढासळली
या सामन्यात भारतानं खूप खराब फलंदाजी केली. भारताचे फंलदाज एकामागून एक बाद होत होते. श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी भारताचा डाव सावरला.श्रेयस अय्यरनं (82 धावा) आणि अक्षर पटेल (56 धावा) यांनी अर्धशतकीय खेळी करत भारतीय संघाचा डाव सावरला. श्रेयस आणि अक्षर यांनी पाचव्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी रचली. परंतु, 35 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर श्रेयस अय्यर मेहंदी हसनच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. त्यानंतर 38 व्या षटकात अक्षर पटेलनंही आपली विकेट गमावली. दोघेही मोक्याच्या क्षणी बाद झाले आणि भारताच्या पराभवाचे हे चौथे कारण ठरले.
5) मुस्ताफिजुर रहमानची 48व्या षटकातील उत्कृष्ट गोलंदाजी
बांगलादेशनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला अखेरच्या 3 षटकात 18 धावांची गरज होती. यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा भारताला सामना जिंकून देऊ शकतो, असं चित्र निर्माण झालं होतं. पण बांगलादेशच्या संघानं शक्कल लढवली आणि चेंडू मुस्ताफिजुर रहमानच्या हातात सोपवला. या षटकात मोहम्मद सिराज स्ट्राईकवर होता. मुस्ताफिजुरनं हे षटक निर्धाव टाकलं.
हे देखील वाचा-