लंडन : विश्वचषकापूर्वीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या सराव सामन्यात टीम इंडियाने फलंदाजी आणि गोलंदाजीची चांगलाच सराव केला आहे. सराव सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धचा सामना 95 धावांनी जिंकला. लोकेश राहुल आणि महेंद्रसिंह धोनीच्या शतकी खेळीने धावांचा डोंगर रचण्यात यश आलं.

टीम इंडियाने या सामन्यात बांगलादेशसमोर 360 धावांचं आव्हान उभं केलं होतं. पण भारताच्या प्रभावी माऱ्यासमोर बांगलादेशचा डाव अखेरच्या षटकात 264 धावांत आटोपला. लिटन दास आणि मुशफिकुर रहीमनं 120 धावांची भागीदारी रचून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण तो व्यर्थ ठरला. दासनं 73 तर रहीमनं 90 धावांची खेळी केली. पण हे दोघंही बाद झाल्यानंतर बांगलादेशचा डाव गडगडला.




भारताकडून कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल या फिरकी जोडगोळीनं प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर जसप्रीत बुमरानं दोन विकेट्स घेतल्या. दरम्यान, टीम इंडियाने बांगलादेशसमोर 360 धावांचं आव्हान उभ करण्यात लोकेश राहुल आणि महेंद्रसिंह धोनीने मोलाचा वाटा उचलला. लोकेश राहुलने चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची समस्या दूर करत 99 चेंडूंमध्ये 108 धावा ठोकल्या. यामध्ये 12 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. तर महेंद्रसिंह धोनीनेही शतक ठोकत आपल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन केले.

यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात राहुल 6 आणि धोनीने 17 धावा करून करून बाद झाला होता.