IND vs AUS, WTC Final 2023 : जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलमध्ये टीम इंडियाची दुसऱ्या दिवसअखेर पाच बाद 151 अशी घसरगुंडी उडाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी अजिंक्य रहाणे 29 धावांवर आणि श्रीकर भरत 5 धावांवर खेळत होते. या कसोटीत ऑस्ट्रेलियानं तीन बाद 327 धावांवरून पहिल्या डावात सर्व बाद ४६९ धावांची मजल मारली. भारताकडून मोहम्मद सिराजनं 108 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडलं. मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूरनं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. पण भारतीय गोलंदाजांच्या या कामगिरीला भारतीय फलंदाजांना न्याय देता आला नाही. रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतले. अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जाडेजानं 71 धावांची झुंजार भागीदारी रचली. पण नॅथन लायननं जाडेजाला माघारी धाडून ही जोडी फोडली. त्यामुळं टीम इंडियासमोर फॉलोऑनचा धोका कायम आहे. भारताला फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी किमान 270 धावांची मजल मारण्याची गरज आहे. त्यासाठी टीम इंडियाला अजूनही 119 धावांची आवश्यकता आहे. टीम इंडिाय अद्याप 318 धावांनी पिछाडीवर आहे. सध्या अजिंक्य रहाणे आणि केएस भरत मैदानावर आहेत. 


रविंद्र जाडेजाने धुतले - 
 
टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर रविंद्र जाडेजा याने आक्रमक फलंदाजी केली. जाडेजाने चौफेर फटकेबाजी करत भारताचा डाव सावरला. अजिंक्य रहाणे याने संयमी फलंदाजी करत जाडेजाला चांगली साथ दिली. रविंद्र जाडेजा आणि अजिंक्य रहाणे यांनी पाचव्या विकेटसाठी 71 धावांची भागिदारी केली. जाडेजाने वादळी 48 धावांची खेळी केली. त्याने सात चौकार आणि एक षटकार लगावत ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी फोडून काढली. दुसरीकडे अजिंक्य रहाणे याने संयमी फलंदाजी केली.


भारताची फलंदाजी ढेपाळली - 


ऑस्ट्रेलियाने पहिल्याडावात 469 धावांचा डोंगर उभारला.. दुसऱ्या दिवशी मोहम्मद सिराज याने भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखण्याचे काम केले. पण भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना चांगली सुरुवात देता आली नाही. त्यानंतर अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीही स्वस्तात तंबूत परतले. झटपट 4 विकेट गमावल्यामुळे टीम इंडिया अडचीत सापडली आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी फक्त तीस धावांची सलामी दिली. रोहित शर्मा 15 धावांवर कमिन्सच्या चेंडूवर बाद झाला. तर शुभमन गिल याला 13 धावांवर बोलँड याने तंबूत पाठवले. चेतेश्वर पुजारा 14 धावांवर बाद झाला. कॅमरुन ग्रीन याने पुजाराचा अडथळा दूर केला. विराट कोहलीला स्टार्कने बाद केले. विराट कोहली 14 धावांवर बाद झालाय.