Australia vs India WTC 2023 Final Shubman Gill : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारताची फलंदाजांनी निराश केलेय. 71 धावांत भारताने 4 विकेट गमावल्या आहेत. सलामी फलंदाज शुभमन गिल याला फक्त 13 धावा करता आल्या. गेल्या काही दिवसांत धावांचा रतीब घालणाऱ्या गिल याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. शुभमन गिल याला बोलँड याने तंबूचा रस्ता दाखवला. बोलँडचा चेंडू गिल याला समजलाच नाही...
सातव्या षटकातील चौथ्या चेंडूवर गिल बाद झाला. बोलँड याने फेकलेला चेंडूने गिल याला चकवा दिला. शुभमन गिल याने बोलँडचा चेंडू सोडला.. तो चेंडू विकेटकिपरकडे जाईल असे त्याला वाटले... पण चेंडूने थेट स्टम्प उडवल्या... अशापद्धतीने गिल तंबूत परतला. बाद झाल्यानंतर गिल याला विश्वास बसला नाही. या चेंडूचे कौतुक होतेय. जोश हेजलवूडच्या जाही बोलँडला खेळवण्यात आलेय. बोलँड याने भेदक मारा करत गिल याला तंबूचा रस्ता दाखवला.
पाहा व्हिडीओ -
भारताची फलंदाजी ढेपाळली -
ऑस्ट्रेलियाने पहिल्याडावात 469 धावांचा डोंगर उभारला.. दुसऱ्या दिवशी मोहम्मद सिराज याने भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखण्याचे काम केले. पण भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना चांगली सुरुवात देता आली नाही. त्यानंतर अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीही स्वस्तात तंबूत परतले. झटपट 4 विकेट गमावल्यामुळे टीम इंडिया अडचीत सापडली आहे.
रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी फक्त तीस धावांची सलामी दिली. रोहित शर्मा 15 धावांवर कमिन्सच्या चेंडूवर बाद झाला. तर शुभमन गिल याला 13 धावांवर बोलँड याने तंबूत पाठवले. चेतेश्वर पुजारा 14 धावांवर बाद झाला. कॅमरुन ग्रीन याने पुजाराचा अडथळा दूर केला. विराट कोहलीला स्टार्कने बाद केले. विराट कोहली 14 धावांवर बाद झालाय.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव -
ट्रेविस हेड याची दीडशतकी आणि स्टिव्ह स्मिथ याचे दमदार शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 469 धावांवर मजल मारली. पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने तीन बाद 327 धावांचा डोंगर उभारला होता. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. मोहम्मज सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. स्मिथ आणि हेड यांनी 285 धावांची भागिदारी करत ऑस्ट्रेलियाला ड्रायव्हिंग सीटवर बसवले. मोहम्मद सिराज याने हेडला तंबूत पाठवत जोडी फोडली. ट्रेविस हेड याने 174 चेंडूत वादळी 163 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 25 चौकार आणि एक षटकार लगावला. स्मिथ पहिल्या दिवसी 95 धावांवर नाबाद होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर आक्रमक रुप घेत शतकाला गवसणी घातली. स्मिथ याने 268 चेंडूत 121 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 19 चौकार लगावले. भारताकडून मोहम्मद सिराजने चार विकेट घेतल्या. तर शमी आणि लॉर्ड शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. रविंद्र जाडेजाने एक विकेट मिळवली. उमेश यादवला एकही विकेट मिळवता आली नाही.