IND vs AUS, WTC Final 2023: ट्रेविस हेड याची दीडशतकी आणि स्टिव्ह स्मिथ याचे दमदार शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 469 धावांवर मजल मारली. पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने तीन बाद 327 धावांचा डोंगर उभारला होता. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. मोहम्मज सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली ती स्टिव्ह स्मिथच्या शतकाने... स्मिथने सिराजला लागोपाठ दोन चौकार लगावत शतकाला गवसणी घातली. स्मिथने कसोटी करिअरमधील 31 वे शतक झळकावले. स्मिथ आणि ट्रेविस हेड यांच्या वादळी फलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभारला. स्मिथ आणि हेड यांनी 285 धावांची भागिदारी करत ऑस्ट्रेलियाला ड्रायव्हिंग सीटवर बसवले. मोहम्मद सिराज याने हेडला तंबूत पाठवत जोडी फोडली. ट्रेविस हेड याने 174 चेंडूत वादळी 163 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 25 चौकार आणि एक षटकार लगावला. हेड बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढेपाळली. ग्रीन आणि स्मिथ एकापाठोपाठ तंबूत परतले. ग्रीनला शमीने तर स्मिथला लॉर्ड शार्दूल ठाकूरने तंबूत पाठवले.
अलेक्स कॅरी याने तळाच्या फलंदाजाला जोडीला घेत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या वाढवली. अॅलेक्स कॅरी याने 48 धावांची खेळी केली. यामध्ये सात चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. मिचेल स्टार्क धावबाद जाला. तर पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांना सिराजने तंबूत धाडले. भारताकडून मोहम्मद सिराजने चार विकेट घेतल्या. तर शमी आणि लॉर्ड शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. रविंद्र जाडेजाने एक विकेट मिळवली. उमेश यादवला एकही विकेट मिळवता आली नाही.
पहिल्या दिवशी काय झाले ?
जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. लंडनच्या ओव्हल मैदानातल्या या कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. त्याचा पुरेपूर लाभ उठवून ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवसअखेर तीन बाद ३२७ धावांची मजल मारली. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 251 धावांची अभेद्य भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाला भक्कम स्थितीत नेलं. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, त्यावेळी ट्रॅव्हिस हेड 146 धावांवर आणि स्टीव्ह स्मिथ 95 धावांवर खेळत होता. भारताकडून मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूरनं प्रत्येकी एक विकेट घेतली.