IND vs AUS Records : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात बॉर्डर-गावस्कर मालिका 1996 मध्ये सुरू झाली. त्यावर्षी दोन्ही संघांमध्ये फक्त एकच सामना झाला आणि भारतीय संघाने सात विकेट्सने विजय मिळवला. यानंतर झालेल्या सर्व मालिकांमध्ये अनेक चुरशीचे सामने पाहायला मिळाले तसेच बरेच रेकॉर्ड्सही झाले. यात गोलंदाजीसंबधी खास आकडेवारीबद्दल जाणून घेऊ...
काही गोलंदाजांनी बॉर्डर-गावस्कर मालिकेतील एकाच सामन्याच्या दोन्ही डावात 5-5 विकेट्स (5 विकेट्स) घेतल्या आहेत. असे आतापर्यंत एकूण 8 वेळा घडले आहे, ज्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी 5 वेळा हा रेकॉर्ड केला आहे. त्याचबरोबर कांगारू गोलंदाजांनी तीन वेळा ही कामगिरी केली आहे. ग्लेन मॅकग्रा, हरभजन सिंग, अनिल कुंबळे, आर अश्विन, नॅथन लियॉन आणि स्टीव्ह ओ'कीफ यांचा या यादीत समावेश आहे.
- ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याने बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत पहिल्यांदा ही कामगिरी केली. 1999-2000 मध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली होती. हा सामना 2 जानेवारी 2000 रोजी झाला होता. या सामन्यात मॅकग्राने दोन्ही डावात 5-5 विकेट घेतल्या.
- 2001 मध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेत भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली होती. त्या मालिकेतील एका सामन्याच्या दोन्ही डावात त्याने 5-5 विकेट घेतल्या. यानंतर, तिसऱ्यांदा हरभजन सिंगने मालिकेतील पुढच्या सामन्याच्या दोन्ही डावात पुन्हा 5-5 विकेट्स घेतल्या.
- हरभजन सिंगने चौथ्यांदाही अशीच कामगिरी केली. यावेळी त्याने 2004 मध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेत असे केले.
- यानंतर याच मालिकेतील दुसऱ्या सामन्यात (2004) माजी भारतीय फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेने अशी कामगिरी केली. त्याने सामन्याच्या दोन्ही डावात 5-5 विकेट घेतल्या. मालिकेत अशी कामगिरी करणारा कुंबळे हा पाचवा गोलंदाज ठरला.
- भारतीय फिरकीपटू आर अश्विनने 2013 मध्ये सहाव्यांदा अशी कामगिरी केली होती. त्या मालिकेतील एका सामन्याच्या दोन्ही डावात त्याने 5-5 विकेट घेतल्या.
- ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने सातव्यांदा अशी कामगिरी केली. 2014 च्या मालिकेतील एका सामन्याच्या दोन्ही डावात त्याने 5-5 विकेट घेतल्या होत्या.
- यानंतर, आठव्यांदा, स्टीव्ह ओ'कीफने 2017 मालिकेत एका सामन्याच्या दोन्ही डावात 5-5 विकेट घेतल्या.
दरम्यान या यादीतील भारताचा आर अश्विन आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन हे दोघेही यंदाही मैदानात उतरणार असल्याने त्यांच्या गोलंदाजीवर अनेकांच्या नजरा असतील.
हे देखील वाचा-