IND vs AUS Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेकीचा कौल जिंकला. कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. नाणेफेक झाल्यानंतर एक अजब योगायोग समोर आला.  फायनलमध्ये भारताने जेव्हा जेव्हा नाणेफेक गमावली, तेव्हा तेव्हा भारताने विश्वचषक उंचावलाय. 1983 आणि 2011 च्या विश्वचषक फायनलमध्ये टीम इंडियाने नाणेफेक गमावली होती. पण टीम इंडियाने विश्वचषक उंचावला होता. आजही रोहित शर्माने नाणेफेक गमावली, त्यानंतर भारतीय संघाच्या चषक विजयाची शक्यता आणखी वाढली. 


योगायोग काय जुळून आला - 


1983 - भारतीय संघाचा कर्णधार कपिल देव यांनी विश्वचषकाच्या फायनलमध्ये नाणेफेक गमावली होती. भारताने प्रथम फलंदाजी करताना फलंदाजी करताना 183 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल वेस्ट इंडिजचा संघ 140 धावांत ऑलआऊट झाला होता. मोहिंदर अमरनाथ यांना सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.   


2011 - विश्वचषकात एमएस धोनीने नाणेफेक गमावली होती. कुमार संगाकाराने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताल होता. जयवर्दनेच्या शतकाच्या बळावर लंकेने 277 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल भारताने हे आव्हान सहा विकेटच्या मोबदल्यात पार पाडले. एमएस धोनी आणि गौतम गंभीर यांनी शानदार खेळी केली होती. धोनीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 


2023 - आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये रोहित शर्माने नाणेफेक गमावली आहे. पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेय. 






आणखी एक योगायोग - 



2003 Final - विश्वचषकाच्या फायनलमध्ये सौरव गांगुलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना दोन विकेट्सच्या मोबदल्यात 359 धावांचा डोंगर उभारला होता. पॉटिंगने शतक ठोकले होते. प्रत्युत्तरदाखल भारतीय संघ 234 धावांपर्यंत मजल मारु शकला. 


2023 Final - ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्याकडून आक्रमक सुरुवात मिळाली आहे. आजच्या सामन्यातही नाणेफेक गमावणारा संघ चषक उंचावणार का?