सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील शेवटची मॅच सिडनीत होणार आहे. सिडनी कसोटीमध्ये विजय मिळवणं भारतीय क्रिकेट संघाला दोन गोष्टींसाठी महत्त्वाचं आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आपल्याकडे राहण्यासाठी सिडनी कसोटीतील विजय महत्त्वाचा आहे. याशिवाय जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता कायम ठेवायची असल्यास सिडनी कसोटीत विजय मिळवणं आवश्यक आहे. भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं देखील कोणत्याही परिस्थिती बॉर्डर गावसकर ट्रॉफी हातून जाऊ देणार नाही असं म्हटलंय. भारत या मालिकेत 2-1 नं पिछाडीवर आहे. सिडनी कसोटीसाठी भारतीय संघाची निवड करताना गौतम गंभीर भाकरी फिरवण्याची शक्यता आहे. कॅप्टन रोहित शर्मा ऐवजी संघाचं नेतृत्त्व जसप्रीत बुमराहकडे जाण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह सिडनी कसोटीत कुणाला संधी देणार हे पाहावं लागेल. 


 
सिडनी कसोटीत भारतीय संघात मोठे फेरबदल? 


सिडनी कसोटीत भारतीय संघात मोठे फेरबदल होऊ शकतात. जसप्रीत बुमराहकडे भारतीय संघाचं नेतृत्त्व जाऊ शकतं. रोहित शर्मानं सिडनी कसोटी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आकाशदीप दुखापतग्रस्त असल्यानं खेळणार नाही. 


जसप्रीत बुमराहनं भारताला पर्थ कसोटीत विजय मिळवून दिला होता. ती या मालिकेतील पहिली कसोटी होती. रोहित शर्मा प्रमाणं भारताचा विकेटकीपर रिषभ पंत देखील चांगली कामगिरी करु शकलेला नाही. मेलबर्न कसोटीत शॉट सिलेक्शनवरुन रिषभ पंतवर टीकेची झोड उठली होती. रिषभ पंतवर त्यामुळं गंभीर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. सिडनी कसोटीत त्यामुळं ध्रुव जुरेलला संधी मिळेल अशा चर्चा आहेत.  मात्र सिडनीच्या मैदानावर रिषभची कामगिरी चांगली आहे. त्यानं 2018 मध्ये शतक केलं होतं. 2021 ला 97  धावांची खेळी केली होती. 


 सिडनी कसोटीत भारतीय संघात रोहित शर्मा आणि आकाशदीप नसतील हे स्पष्ट आहे. गौतम गंभीर हर्षित राणाला संधी देऊ शकतो. राणाला संधी मिळते मात्र तो चांगली कामगिरी करु शकलेला नाही. त्यामुळं प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळू शकते.  दुसरीकडे शुभमन गिलला देखील संधी मिलेल अशा चर्चा आहेत. 



भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, नितीशकुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल/ रिषभ पंत 


ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ : पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, सॅम कोनस्टास, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, मिशेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), नॅथन लायन, मिशेल स्टार्क, स्कॉट बोलंड


इतर बातम्या :