IND vs AUS 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला असून टीम इंडियासाठी दिवसाची सुरुवात चांगली झाली आहे. भारताने पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाचे 6 गडी बाद करत संघाला सर्वबाद केलं आहे. 197 धावांवर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव आटोपला असून त्यांच्याकडे सध्या 88 धावांची आघाडी आहे. आता भारत आपला दुसरा डाव खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पहिल्या दिवशी भारतीय संघाला अवघ्या 109 धावांत कांगारुंनी सर्वबाद केलं. ज्यानंतर दिवस संपताना ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमावत 156 धावा केल्या होत्या. या चारही विकेट्स जाडेजाने घेतल्या होत्या, तर आता दुसऱ्या दिवशी उमेश यादव आणि रवींचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या आहेत. कांगारुंकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक 60 धावा केल्या आहेत.
सर्वात आधी नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पिच फिरकी गोलंदाजीसाठी अधिक फायदेशीर असल्याने प्रथम फलंदाजी घेणं भारताला तोट्याचं ठरलं. ऑस्ट्रेलियाच्या तीन फिरकीपटूंनी मिळून संपूर्ण भारतीय संघाला सर्वबाद केलं. एकही विकेट न गमावता 27 धावा केल्यानंतर भारतीय संघाने पुढील 18 धावांत 5 विकेट गमावल्या. ज्यानंतर पुढे कशातरी 100 पार धावा भारताने केल्या आणि 33.2 षटकांत 109 धावांवर भारताचा डाव आटोपला. यावेळी मॅथ्यू कुहनेमनने फारच अप्रतिम कामगिरी केली आहे. कुहनेमनला पदार्पणाच्या कसोटीत केवळ दोन विकेट मिळाल्या होत्या. पण आपल्या दुसऱ्या कसोटीत कुहनेमनने पहिल्या चार षटकांतच टीम इंडियाला 3 धक्के देत एका डावात 5 विकेट्स घेण्याचा मान मिळवला. कुहनेमनने प्रथम कर्णधार रोहित शर्माला (12 धावा) यष्टिमागे झेलबाद केलं. त्यानंतर त्याच्या पुढच्याच षटकात सलामीवीर शुभमन गिलला (21 धावा) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. श्रेयस अय्यरला (0) बोल्ड करुन अखेर अश्विन आणि उमेश यादव या अखेरच्या फळीतील महत्त्वाच्या विकेट्सहील त्याने घेतल्या. याशिवाय अनुभवी नॅथन लायनने चेतेश्वर पुजारा (1 धाव) आणि रवींद्र जाडेजा (4 धावा) आणि केएस भरत (17 धावा) या विकेट्स घेतल्या. तर मर्फीने विराटची (22 धावा) मोठी विकेट घेतली. मग ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात झाल्यावर त्यांनी सुरुवातीपासून चांगली फलंदाजी केली. सलामीवीर ट्रेविस हेड 9 धावांवर जाडेजाकडून बाद झाल्यावर ख्वाजा आणि लाबुशेननं डाव सावरला. पण या दोन्ही सेट फलंदाजांना आणि त्यानंतर कॅप्टन स्टीव्ह स्मिथलाही जाडेजानं आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत तंबूत धाडलं.दिवस संपताना जाडेजानं 24 षटकं टाकून 63 धावा देत 4 महत्त्वाचे विकेट्स घेतले होते.
11 धावांत 6 गडी तंबूत
दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर ऑस्ट्रेलियानं आक्रमक फलंदाजी सुरु केली 156 वर डाव सुरु केल्यावर 186 धावांपर्यंत एकही विकेट पडली नाही. पण त्यानंतर आर अश्विन आणि उमेश यादव या जोडीने दमदार गोलंदाजी करत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या आणि 186 वर पाचवी विकेट पडल्यावर 197 तर ऑस्ट्रेलिया सर्वबाद झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे 6 गडी केवळ 11 धावांमध्ये तंबूत परतले.
हे देखील वाचा-