IND vs AUS 3rd T20I:  ग्लेन मॅक्सवेलच्या वादळी शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच विकेटने पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-1 ने कमबॅक केलेय. भारताने दिलेल्या 223 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर 5 विकेट राखून पूर्ण केले. ग्लेन मॅक्सवेलने 48 चेंडूत 104 धावांचा पाऊस पाडला. मॅक्सवेलच्या वादळी शतकामुळे ऋतुराज गायकवाडचे शतक व्यर्थ ठरले.


ग्लेन मॅक्सवेलच्या वादळामध्ये भारतीय गोलंदाजांचा पालापाचोळा झाला. एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. रवि बिश्नोई याचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला धावगतीला आवर घालता आली नाही. मॅक्सवेलच्या शतकामुळेच ऑस्ट्रेलियाने अशक्यप्राय विजय मिळवला.  ऑस्ट्रेलियाला अखेरच्या 48 चेंडूत 102 धावांची गरज होती. मॅक्सवेलने भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. 


ग्लेन मॅक्सवेल याने 48 चेंडूत नाबाद 104 धावांची खेळी केली. मॅक्सवेलने अखेरच्या षटकात 23 धावा वसूल करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. मॅक्सवेलने 48 चेंडूत 216 च्या स्ट्राईक रेटने 104 धावा केल्या. यामध्ये आठ गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. त्याशिवाय त्याने आठ खणखणीत चौकारही लगावले.  मॅक्सवेल आणि मॅथ्यू वेड यांनी सहाव्या विकेटसाठी 40 चेंडूत 91 धावांची अभेद्य भागिदारी केली. यामध्ये मॅक्सवेलने 57 धावा चोपल्या तर मॅथ्यू वेड याने 28 धावांचे योगदान दिले.  मॅक्सवेलने स्टॉयनिसोबत 60 धावांची भागिादरी केली. मॅक्सवेलच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने मालिकेतील आव्हान जिवंत ठेवलेय.


ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड याने 18 चेंडूत 35 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने आठ चौकार ठोकले. त्याशिवाय एरॉन हार्डे याने 12 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 16 धावा केल्या. जोस इंग्लिंश याने 6 चेंडूत दहा धावा केल्या. मार्कस स्टॉयनिस याने 21 चेंडूत 17 धावा केल्या. टीम डेविडला खातेही उघडता आले नाही. मॅथ्यू वेड याने 16 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 28 धावांचे योगदान दिले. 


भारताकडून रवि बिश्नोई सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकात 32 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. प्रसिध कृष्णा याने महागडी गोलंदाजी केली. त्याने चार षटकात 68 धावा खर्च केल्या. अर्शदीप सिंह याने 4 षटकात 44 धावा खर्च करत एक विकेट घेतली. आवेश खान आणि अक्षर पटेल यांनी चार षटकात प्रत्येकी 37 धावा खर्च करत एक एक विकेट घेतली. 


दरम्यान, भारताने प्रथम फलंदाजी करताना 223 धावांचा डोंगर उभारला होता. यामध्ये ऋतुराज गायकवाड याने नाबाद 123 धावांची खेळी केली होती. मॅक्सवेलच्या शतकी खेळीमुळे ऋतुराजचे शतक पाण्यात गेले.