T20 World Cup 2024 IND vs SA Final :  भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. बार्बाडोसच्या मैदानात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी20 विश्वचषकाच्या फायनलचा थरार सुरु आहे. दोन भक्कम संघामध्ये फायनल होत आहे, असे नाणेफेकीवेळी रोहित शर्माने सांगितले. दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघाने आपल्या प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केला नाही. मागील सामन्यातील संघ कायम ठेवण्यात आलाय. 


दक्षिण अफ्रिकाच्या ताफ्यात कोण कोण?


क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), रीजा हेंड्रिक्स, एडेन मार्कराम (कर्णधार), ट्रस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन  डेविड मिलर, मार्को यानसेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे आणि तबरेज़ शम्सी.



भारताची प्लेईंग 11-


रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह. 


 टी20 विश्वचषकाचा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं आज बार्बाडोसच्या रणांगणात मिळणार आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री आठ वाजता सुरु होईल. टी20 किंवा वन डे विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ फायनलच्या मैदानात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताची फायनलमध्ये धडक मारण्याची तिसरी वेळ आहे. पण आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावली आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांनी यंदाच्या विश्वचषकात प्राथमिक आणि अव्वल साखळीवरही आपला ठसा उमटवला. हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत. त्यामुळं यंदाचा टी20 विश्वचषक कोण जिंकतो, याकडे क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे. भारतानं टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारण्याची ही तिसरी वेळ आहे. 2007 साली भारतानं पाकिस्तानला हरवून टी20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. त्यानंतर 2014 सालच्या टी20 विश्वचषकात भारताला फायनलमध्ये श्रीलंकेकडून हार स्वीकारावी लागली होती. पण आयसीसीच्या स्पर्धेत मागील पाचवेळा भारतीय संघ जेव्हा जेव्हा फायनलला पोहचलाय, त्यावेली स्वप्न भंगलेय. हेच कोडं सोडवण्याची संधी आज पुन्हा एकदा भारताकडे आलेली आहे.  


कर्णधाराची भूमिका विजयात निर्णायक



विश्वचषकासारख्या सर्वोच्च व्यासपीठावर कर्णधाराची भूमिका ही विजयात निर्णायक ठरते. यंदाचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकही त्याला अपवाद नाही. या विश्वचषकाच्या निमित्तानं भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रम यांचं नेतृत्त्व उजळून निघालंय. दोघांनी एक फलंदाज म्हणूनही आपापल्या संघाच्या अंतिम फेरीपर्यंतच्या वाटचालीत मोलाची भूमिका निभावलीय. दक्षिण आफ्रिकेनं आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच टी20 विश्वचषकाची फायनल गाठलीय. भारतानं टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारण्याची ही तिसरी वेळ आहे. 2007 साली भारतानं पाकिस्तानला हरवून टी20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. त्यानंतर 2014 सालच्या टी20 विश्वचषकात भारताला फायनलमध्ये श्रीलंकेकडून हार स्वीकारावी लागली होती.