मुंबई : जागतिक वन डे रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेला अफगाणिस्तानचा गोलंदाज रशीद खान नऊ षटकात 110 धावा देत सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. रशीदचा विक्रम लाजिरवाणा असला, तरी आईसलँड क्रिकेटने त्याची ट्विटरवरुन उडवलेली खिल्ली कोणालाच रुचलेली नाही. रशीद बॅड पॅचमधून सावरेल, असा विश्वास व्यक्त करत अनेकांनी आईसलँड क्रिकेटवर टीकेची झोड उठवली आहे.


विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडच्या फलंदाजांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचा धुव्वा उडवला. इंग्लंडने अफगाणिस्तानच्या समोर 397 धावांचा डोंगर उभा केला होता. यजमान संघ अफगाणिस्तानला नेस्तनाबूत करेल, याची प्रेक्षकांना खात्री होतीच. मात्र हा सामना एकतर्फी होऊन इंग्लंड 150 धावांनी मात करेल, याचा विचार कोणाच्याही मनात नव्हता.

गेल्या वर्षी रशीद खानने आयसीसी वन डे रँकिंगमध्ये पहिला क्रमांक पटकावणारा सर्वात कमी वयाचा गोलंदाज होण्याचा बहुमान मिळवला होता. परंतु इंगलंडच्या फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीची पिसं काढली. रशीदसाठी हा सर्वात दुर्दैवी दिवस ठरला. मॉर्गनने 71 चेंडूत 17 षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 148 धावांची विक्रमी खेळी केली. पहिल्या चार षटकात त्याने 29 धावा दिल्या, तर पुढच्या पाच षटकात त्याने तब्बल 81 धावा दिल्या. त्यामुळे एकही गडी न गमावता नऊ षटकात रशीदने 110 धावा देण्याचा पराक्रम केला.

विश्वचषक स्पर्धेच्या 44 वर्षांच्या इतिहासातला आतापर्यंतचा हा सर्वात महागडा स्पेल ठरला आहे. तर वनडे इतिहासात शंभरपेक्षा अधिक धावा देणारा तो पहिला फिरकीपटू ठरला.

एकीकडे, सोशल मीडियावर यूझर्सनी त्याची विकेट घेतली, तर ल्युक राईट, स्टुअर्ट ब्रॉड, जोफ्रा आर्चर, इश सोधी सारख्या क्रिकेटपटूंनी रशीदला पाठिंबाही दिला. मात्र आईसलँड क्रिकेटच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊण्टवरुन त्याची चांगलीच टेर उडवण्यात आली.

'रशीद खानने विश्वचषक 2019 मध्ये अफगाणिस्तानसाठी पहिलं शतक ठोकल्याचं ऐकलं. मस्त. 56 चेंडूंमध्ये 110 धावा. विश्वचषकात एखाद्या गोलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा. मस्त फलंदाजी केलीस' अशा आशयाचं ट्वीट करण्यात आलं.