बर्मिंगहॅम : विश्वचषकाच्या रणांगणात टीम इंडियाचा सामना उद्या यजमान इंग्लंडशी होत आहे. हा सामना बर्मिंगहॅमच्या एजबस्टनवर खेळवण्यात येईल. टीम इंडियानं बर्मिंगहॅमची ही लढाई जिंकली, तर त्यांचं उपांत्य फेरीचं तिकीट कन्फर्म होईल. पण इंग्लंडला विश्वचषकातलं आव्हान राखायचं, तर भारतीय संघाला हरवणं आवश्यक आहे. त्यामुळं भारत आणि इंग्लंड संघांमधला हा सामना अतिशय चुरशीचा होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे.


विराट कोहली आणि ज्यो रुट....

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या फॅब्युलस फोरपैकी दोन महत्वाचे शिलेदार. आणि हे दोघेही जेव्हा एकमेकांसमोर येतील तेव्हा काय होईल याची उत्सुकता तमाम क्रिकेटरसिकांना लागून राहिली आहे.

बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संघांमध्ये विश्वचषकाचा साखळी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी उपांत्यफेरीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

याचं कारण विराटसेनेची सरशी झाल्यास टीम इंडियाचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित होईल. आणि इंग्लंडला उपांत्य फेरीच्या तिकीटासाठी देव पाण्यात ठेवावे लागतील. उभय संघांमधला हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.

टीम इंडिया यंदाच्या विश्वचषकात अपराजित असलेला एकमेव संघ आहे. आणि याचं मोठं श्रेय जातं ते कर्णधार विराट कोहलीला.  विराटनं या विश्वचषकात पाच सामन्यांमध्ये 63.20 च्या सरासरीनं 316 धावा केल्या आहेत. यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 82, पाकविरुद्ध 77, अफगाणिस्तानविरुद्ध 67 आणि वेस्ट इंडिजवरुद्ध 72 अशा सलग चार अर्धशतकांचा समावेश आहे.

भारतीय कर्णधाराच्या या विराट कामगिरीप्रमाणेचं इंग्लंडसाठी ज्यो रुटची कामगिरी महत्वाची ठरली आहे.  रुटनं या विश्वचषकात सात सामन्यात 72 च्या सरासरीनं 432 धावांचा रतीब घातला आहे. त्यात दोन शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. रुटच्या या कामगिरीमुळे ऑइन मॉर्गनच्या इंग्लिश फौजेनं सातपैकी चार सामन्यांत यश मिळवलंय. त्यामुळे एजबॅस्टनवर रुटची कामगिरी इंग्लंडसाठी निर्णायक ठरेल.

विश्वचषकाच्या इतिहासात इंग्लंडला विजेतेपदानं वारंवार हुलकावणी दिली आहे. यावेळी मायदेशात विजेतेपदाचं ते स्वप्न साकारण्याच्या निर्धारानं इंग्लंडचा संघ मैदानात उतरला आहे. पण उपांत्य फेरी इंग्लंडसाठी अजूनही लांब आहे.

1999 पासून  विश्वचषकात इंग्लंडला भारताविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. 1999 आणि 2003 साली भारतानं इंग्लंडचा मोठ्या फरकानं धुव्वा उडवला होता. तर 2011 च्या विश्वचषकातला सामना टाय झाला होता. यंदाच्या विश्वचषकातला टीम इंडियाचा ताजा फॉर्म पाहता इंग्लंडसाठी हा इतिहास बदलणं सध्यातरी कठीण वाटत आहे.

पण इंग्लंड हा इतिहास बदलू शकेल? की टीम इंडियाची घोडदौड अशीच सुरु राहील? फॅब्युलस विराट कोहली आणि फॅब्युलस ज्यो रुट यापैकी कोण आपल्या संघाला उपांत्य फेरीत नेऊन ठेवतोय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला रविवारी रात्री मिळणार आहेत.