ICC T20I batsmen Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. खरं तर, UAE मध्ये खेळल्या जात असलेल्या 2021 T20 विश्वचषकात तीन अर्धशतकं झळकावणारा पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर वन फलंदाज बनला आहे. इंग्लंडच्या डेव्हिड मलानला मागे टाकत त्याने ही कामगिरी केली.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सलग दोन अर्धशतके झळकावल्यानंतर ताज्या फलंदाजीच्या यादीत इंग्लंडच्या डेव्हिड मलानच्या जागी पहिल्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. तो कारकिर्दीत सहाव्यांदा अव्वल स्थानी पोहोचला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्येही तो सध्या नंबर वन फलंदाज आहे.
जोस बटलरने कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग मिळवले
टी-20 विश्वचषकात इंग्लंडच्या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचा परिणाम क्रमवारीतही दिसून आला. जोस बटलरने आठ स्थानांनी प्रगती करत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट क्रमवारीत नवव्या स्थानावर, तर जेसन रॉय पाच स्थानांनी 14व्या स्थानावर पोहोचला आहे. T20 इंटरनॅशनलच्या टॉप-10 फलंदाजांच्या यादीत फक्त दोन भारतीय आहेत. कर्णधार विराट कोहली पाचव्या तर केएल राहुल आठव्या क्रमांकावर आहे.
वानिंदू हसरंगा नंबर वन गोलंदाज
श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगा याने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध प्रत्येकी तीन बळी घेत कारकिर्दीत प्रथमच गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या तबरेझ शम्सीची जागा घेतली, जो एप्रिलपासून अव्वल स्थानावर होता. गोलंदाजांच्या यादीत अव्वल चार स्थानांवर फिरकीपटूच आहेत. हसरंगा आणि शम्सीनंतर इंग्लंडचा आदिल रशीद आणि अफगाणिस्तानचा रशीद खान यांचा क्रमांक लागतो. वेगवान गोलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या एनरिक नोर्कियाने 18 स्थानांनी झेप घेत सातव्या स्थानावर झेप घेतली आहे.
दुसरीकडे, अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी बांगलादेशच्या शाकिब अल हसनच्या बरोबरीने 271 रेटिंग गुणांसह अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. या यादीत हसरंगा चौथ्या क्रमांकावर आहे.