India vs Afghanistan: अबुधाबीच्या शेख जायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुपर 12 सामन्यात टीम इंडियाने पहिल्यांदा खेळताना अफगाणिस्तानला 211 धावांचे लक्ष्य दिले. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 74 धावा केल्या. त्याचवेळी केएल राहुलने 69 धावांची खेळी खेळली. शेवटी ऋषभ पंतने केवळ 13 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या आणि हार्दिक पांड्याने 13 चेंडूत नाबाद 35 धावांची स्फोटक खेळी केली. अशाप्रकारे भारताने 20 षटकांत 2 गडी गमावून 210 धावा केल्या. 2021 च्या T20 विश्वचषकात पहिल्यांदाच एखाद्या संघाने 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.


रोहित आणि राहुलची धमाकेदार सुरुवात
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला आज सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुलने शानदार सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 14.4 षटकांत 140 धावा जोडल्या. रोहित 47 चेंडूत 74 धावा करून बाद झाला. त्याने आठ चौकार आणि तीन षटकार मारले. त्याचवेळी केएल राहुलने 48 चेंडूत 69 धावांची खेळी केली. यादरम्यान राहुलच्या बॅटमधून सहा चौकार आणि दोन षटकार आले.


शानदार सुरुवात केल्यानंतर कर्णधार कोहलीने स्फोटक फलंदाज ऋषभ पंतला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले. पंतने केवळ 13 चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 27 धावा केल्या. त्याचवेळी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पांड्याने 13 चेंडूत नाबाद 35 धावांची खेळी केली. पांड्याच्या बॅटमधून चार चौकार आणि दोन षटकार आले. तर अफगाणिस्तानकडून गुलाबदीन नायब आणि करीम जनात यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. स्टार फिरकीपटू राशिद खानला यश मिळाले नाही. त्याने चार षटकात एकूण 36 धावा दिल्या.


आज हरलो तर भारताची सेमीफायनलची शर्यत संपणार
टी-20 विश्वचषक 2021 मध्ये (T20 World Cup 2021) भारताला चांगली कामगिरी बजावता आलेली नाही. विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीत भारताला सलग दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताचा दोन्ही सामन्यात पराभव झाला असला तरी भारत अजूनही स्पर्धेतून बाहेर झाला नाही. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. तसेच इतर निकालही त्यांच्या बाजूने लागले पाहिजेत.