India vs Australia Warm-up Match: दुबईत खेळल्या जाणाऱ्या 2021 टी 20 विश्वचषक सराव सामन्यात पहिल्यांदा खेळत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 153 धावांचे लक्ष्य दिलं आहे. एकेवेळी ऑस्ट्रेलियाचे चौथ्या षटकात फक्त 11 धावांवर तीन गडी बाद अशी परिस्थिती होती. पण या नंतर स्टीव्ह स्मिथ 57, ग्लेन मॅक्सवेल 37 आणि मार्कस स्टोइनिस नाबाद 41 धावा काढत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. रविचंद्रन अश्विनने भारतासाठी अवघ्या 8 धावांत दोन बळी घेतले. याशिवाय राहुल चहर, रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्याचा हा निर्णय सुरुवातीला पूर्णपणे चुकीचा ठरला. डेव्हिड वॉर्नर 01, आरोन फिंच 08 आणि मिशेल मार्श 00 स्वस्तात बाद झाले. मात्र, यानंतर स्टीव्ह स्मिथने जबाबदारी स्वीकारली आणि प्रथम ग्लेन मॅक्सवेलसोबत चौथ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली.
मॅक्सवेल 28 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 37 धावा करून बाद झाला. भुवनेश्वर कुमारने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. स्मिथ आणि मार्कस स्टोइनिसने 72 धावांवर चार विकेट पडल्यानंतर डावाची धुरा सांभाळली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. स्मिथने 48 चेंडूत 57 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सात चौकार आले. त्याचबरोबर मार्कस स्टोइनिस 25 चेंडूत 41 धावांवर नाबाद राहिला. त्याने चार चौकार आणि एक षटकार ठोकला. त्याचवेळी मॅथ्यू वेड एका चेंडूवर नाबाद चार धावा करून परतला.
सुपर 12 सामने :
- 24 ऑक्टोबर (रविवार) : भारत विरुद्ध पाकिस्तान : दुबई : संध्याकाळी 07.30 वाजता
- 31 ऑक्टोबर (रविवार) : भारत विरुद्ध न्यूझिलंड : दुबई : संध्याकाळी 07.30 वाजता
- 03 नोव्हेंबर (बुधवार) : भारत विरुद्ध अफगाणिस्तान : अबु धाबी : संध्याकाळी 07.30 वाजता
- 05 नोव्हेंबर (शुक्रवार) : भारत विरुद्ध B1 (क्वॉलिफायर) : संध्याकाळी 07.30 वाजता
- 06 नोव्हेंबर (सोमवार) : भारत विरुद्ध A2 (क्वॉलिफायर) : संध्याकाळी 07.30 वाजता