ICC Cricket World Cup 2023 : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरोधात आपल्या विश्वचषकाच्या अभियानाची सुरुवात करत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आठ ऑक्टोबर, रविवारी चेन्नईमध्ये सामना होणार आहे. विश्वचषकातील या सामन्याकडे भारत आणि ऑस्ट्रेलियातील तसेच जगभरातील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्यापूर्वी या दोन संघांची हेड टू हेड आकडेवारी पाहूयात..


वनडे फॉर्मेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आमनासामन्याचा इतिहास जुना आहे.  1980 ते 2023 पर्यंत दोन्ही संघामध्ये तब्बल 149 वनडे सामने झाले आहेत.  यादरम्यान ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे, कारण ऑस्ट्रेलियाने तब्बल 83 सामन्यात विजय मिळवला आहे. तर भारताला फक्त 56 सामन्यात विजय मिळवता आला आहे. दहा सामन्याचा कोणताही निकाल लागला नाही. दोन्ही संघामध्ये एकही सामना बरोबरीत सुटला नाही. रविवारी चेन्नईच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये लढाई होणार आहे. पाहूयात, हेड टू हेड आकडेवारी...


वनडे फॉर्मेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हेड टू हेड


टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये भारतामध्ये आतापर्यंत 70 सामने झाले आहेत. यामध्ये भारताने 32 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 33 सामन्यात विजय मिळवला आहे. पाच सामन्याचा निकाल लागला नाही. भारतामध्ये ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे.


ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडिया आणि कांगारु यांच्यामध्ये आतापर्यंत 54 सामने झाले आहेत, त्यामध्ये भारतीय संघाला फक्त 14 सामन्यात विजय मिळला आहे, तर ऑस्ट्रेलियाने 38 सामन्यात बाजी मारली आहे. दोन सामन्याचा कोणताही निकाल लागला नाही. मायभूमीतही ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे.


न्यूट्रल ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 25 सामने झाले आहेत.  त्यामध्ये भारताने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेलियाने 12 सामन्यात बाजी मारली आहे. तीन सामन्याचा कोणताही निकाल लागला नाही. 


आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये  12 वेळा आमना सामना झाला आहे. त्यामध्ये भारताला फक्त चार सामन्यात विजय मिळाला, तर  8 सामन्यात कांगारुंनी बाजी मारली.


चेन्नईमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. येथेही ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड आहे. कांगारुंनी चेन्नईमध्ये दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर भारताला फक्त एक सामना जिंकता आला आहे.


वरील सर्व आकडे पाहता, वनडे फॉर्मेटमध्ये कांगारुंचे पारडे जड दिसतेय. ऑस्ट्रेलियाने भारतावर प्रत्येक ठिकाणी वर्चस्व गाजवले आहे. पण यंदाचा विश्वचषक भारतात होतोय, भारतीय संघही तुफान फॉर्मात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ संतुलीत दिसत आहेत. दोन्ही संघाला विजयाचा दावेदार म्हटले जात आहे. त्यामुळे चेन्नईत होणारा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.