ICC ODI Ranking : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अनुक्रमे पहिले आणि द्वितीय स्थान कायम राखले आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गोलंदाजांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये विराट कोहलीने 89 आणि 63 धावा केल्या होत्या. कोहलीकडे 870 गुण आहेत. दुखापतीमुळे रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावरील मर्यादित षटकांच्या मालिकेचा भाग नव्हता. कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर आणि त्यानंतर रोहितने एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. तरीही रोहित शर्मा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमहून (837) अधिक पाच गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा रॉस टेलर (818) आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंच (791) हे फलंदाजांच्या यादीत इतर पाच खेळाडू आहेत.


टॉप 5 फलंदाज


1. विराट कोहली (भारत)
2. रोहित शर्मा (भारत)
3. बाबर आजम (पाकिस्तान)
4. रॉस टेलर (न्यूझीलंड)
5. अॅरॉन फिन्च (ऑस्ट्रलिया)


आयर्लंडचा सलामीवीर पॉल स्टर्लिंगने आठ स्थानांचा फायदा झाला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात दोन शतकांसह 285 धावा करून 20 व्या स्थानावर झेप घेतली आहे. अफगाणिस्तानच्या हशमतुल्लाह शाहदी, रशीद खान आणि जावेद अहमदी यांनीही आयसीसी रँकिंगमध्ये स्थान मिळवलं आहे.


गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह सर्वोत्कृष्ट भारतीय असून, तो 700 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बाउल्ट (722) आणि अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान (701) अनुक्रमे पहिल्या दुसऱ्या स्थानावर आहेत. बांगलादेशचा फिरकी गोलंदाज मेहदी हसन मिराजने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याने सात विकेट्स घेतल्या होत्या. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानही 19 व्या स्थानावरुन आठव्या स्थानावर आला.


टॉप 5 गोलंदाज

1. ट्रेन्ट बाउल्ट (न्यूझीलंड)
2. मुजीब उर रेहमान (अफगाणिस्तान)
3. जसप्रीत बुमराह (भारत)
4. मेहंदी हसन (बांगलादेश)
5. अॅरॉन फिन्च (ऑस्ट्रेलिया)

आयसीसीच्या ताज्या रँकिंगमध्ये बांगलादेशच्या अन्य खेळाडूंनाही फायदा झाला आहे. ज्यात शाकिब अल हसन आणि मुशफिकुर रहीम यांचा समावेश आहे. गोलंदाजांमध्ये शाकिब अल हसनने 13 व्या स्थानावर तर मुशफिकुर रहिम फलंदाजांमध्ये 15 व्या स्थानावर पोहोचला आहे.