ICC lift Sri Lanka Ban : आयसीसीने (International Cricket Council) श्रीलंका क्रिकेट बोर्डावरील (Sri Lanka Cricket Board) निलंबन मागे घेतले आहे. आयसीसीने रविवारी हा निर्णय घेतला. आयसीसीने श्रीलंका क्रिकेटवरील बंदी तात्काळ उठवली आहे. सरकारी हस्तक्षेपामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने श्रीलंकन क्रिकेटवर बंदी घातली होती. आयसीसीच्या निर्णयाने क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली होती.
10 नोव्हेंबर 2023 रोजी, श्रीलंका क्रिकेटला ICC चे सदस्य म्हणून त्याच्या जबाबदाऱ्यांचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत श्रीलंका द्विपक्षीय मालिका आणि आयसीसी स्पर्धांमध्ये खेळू शकेल असा निर्णय घेण्यात आला. पण सध्या खेळला जाणारा अंडर-19 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आला. याआधी ही स्पर्धा श्रीलंकेत आयोजित करण्यात आली होती.
आयसीसीने बंदी उठवली
आयसीसीने सांगितले की आता ते पूर्णपणे समाधानी आहेत, त्यानंतर श्रीलंकन बोर्डाकडून बंदी उठवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हटले आहे की आयसीसी बोर्डाकडून श्रीलंकन क्रिकेट बोर्डाची परिस्थिती पाहिली जात आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याकडे विशेष लक्ष असणार असल्याचे आयसीसीने म्हटले.
निलंबनानंतर निवड समितीत फेरबदल झाले
आयसीसीने केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर श्रीलंकन क्रिकेट बोर्डामध्ये बदल पाहायला मिळाले. बोर्डाने निवड समितीत बदल केले होते. माजी क्रिकेटपटू उपुल थरंगा याला पाच सदस्यीय निवड समितीचे अध्यक्ष करण्यात आले. अजंता मेंडिस, इंडिका डी सरम, थरंगा परनाविताना, दिलरुवान परेरा आणि अध्यक्ष उपुल थरंगा यांच्यासह एकूण पाच जणांचा समावेश निवड समितीत करण्यात आला.
2023 च्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेची निराशाजनक कामगिरी
2023 मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. कुशल मेंडिसच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेने 9 पैकी फक्त 2 सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत 9 व्या स्थानी राहिला.