ICC ODI World Cup 2023 : विश्वचषकात खेळत असलेल्या टीम इंडियाचा सर्वात महत्वाचा खेळाडू असलेला हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला आहे. पुण्यात बांगलादेशविरोधातील सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाली आहे. गोलंदाजी करताना हार्दिक दुखापतग्रस्त झाला. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे. हार्दिक पांड्या गोलंदाजी आणि फलंदाजीत योगदान देतो, त्यामुळे टीम इंडियाचे संतुलन वाढते. अतिरिक्त गोलंदाज अथवा फलंदाज टीम इंडिया खेळवू शकते. पण आता हार्दिक दुखापतग्रस्थ झाल्यामुळे टेन्शन वाढले आहे. हार्दिक पांड्याची दुखापत गंभीर असल्यास बदली खेळाडू म्हणून कुणाला संधी दिली जाणार ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यामध्ये अक्षर पटेल याच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. 


बांगलादेशविरुद्ध पुण्यात सुरु असलेल्या सामन्यात हार्दिक पांड्याचा पाय मुरगळला. वैयक्तिक पहिले षटक टाकताना तिसऱ्या चेंडूवर फॉलो-थ्रूने चौकार वाचवण्याच्या प्रयत्नात तो जखमी झाला. डॉक्टरांनी त्याला बरे करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला मैदानाबाहेर जावे लागले. 


हार्दिक पांड्याला दुखापत - 


अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला गोलंदाजी करताना दुखापत झाली. तिसरा चेंडू टाकल्यानंतर हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला. हार्दिक पांड्याची दुखापत भारतासाठी चिंता वाढवणारी आहे. हार्दिक पांड्या पुन्हा मैदानात परतला नाही. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. हार्दिक पांड्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत स्कॅनिंगनंतरच स्पष्टता येणार आहे. 


हार्दिक पांड्याच्या जागी कुणाला मिळणार संधी ?


हार्दिक पांड्याची दुखापत गंभीर असल्यास भारताच्या अडचणी वाढणार आहेत. हार्दिक पांड्या विश्वचषकातून बाहेर गेला तर त्याच्या जागी कुणाला संधी द्यायची...? याचा विचार टीम मॅनेजमेंटसमोर असेल. हार्दिक पांड्याची बरोबरी करणारा पर्याय भारताकडे सध्या तरी उपलब्ध नाही. पण काही खेळाडूंचा विचार केला जाऊ शकतो. 


हार्दिकचा विश्वचषकातून पत्ता कट झाल्यास अक्षर पटेलला टीम इंडियात पुन्हा संधी मिळू शकते. याआधीही त्याचे नाव विश्वचषक संघात समाविष्ट करण्यात आले होते, मात्र दुखापतीमुळे अश्विनचा समावेश करण्यात आला होता. आता अक्षर पटेल याने दुखापतीवर मात केली आहे. त्यामुळे अक्षर पटेल याच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. 


याशिवाय, हार्दिक पांड्याच्या जागी वेगवान अष्टपैलू खेळाडू म्हणून शिवम दुबे आणि विजय शंकर यांच्या नावांचा विचार केला जाऊ शकतो. शिवम दुबेकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नाही, पण त्याची फलंदाजी चांगली आहे. तर विजय शंकर गेल्या विश्वचषकातही टीम इंडियाचा भाग होता, पण त्यानंतर तो संघाबाहेर होता. यावेळी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत आहे. त्यामुळे त्याच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो. 


हार्दिक पांड्या याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या पायाचे स्कॅन करण्यात येईल. त्यानंतर त्याच्या दुखापतीची तिव्रता समजू शकते.