Sourav Ganguly On Virat Kohli: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्मशी झुंज देत आहे. दरम्यान, आपल्या कारकिर्दीत शतकांवर शतक ठोकणारा विराट कोहलीला गेल्या अडीच वर्षात एकही शतक झळकावता आलं नाही. त्यानं 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटीत अखेरचं शतक झळकावलं होतं. तेव्हापासून विराट कोहलीची बॅट शांत आहे. इंग्लंड दौऱ्यातही विराट कोहलीला काही खास कामगिरी करता आली नाही. ज्यामुळं भारतीय संघातील त्याचं स्थान कायम राहील की नाही? अशा चर्चांना उधाण आलंय. याच दरम्यान, भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींनी विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर मोठी प्रतिक्रिया दिलीय.
सध्या भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलाय. या दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका 18-22 ऑगस्टदरम्यान खेळवली जाणार आहे. त्यानंतर 27 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. आशिया चषकाच्या भारतीय संघात विराट कोहलीचा भारतीय संघात समावेश करण्यात आलाय. परंतु, विराट कोहलीचा खराब फॉर्म चिंतेचा विषय बनलाय. याच दरम्यान सौरव गांगुलींनी विराटला एकटे सोडण्याची मागणी केलीय.
सौरव गांगुली काय म्हणाले?
इंडिया टू डेशी बोलताना सौरव गांगुली यांनी विराटच्या खराब फॉर्मवर भाष्य केलं. सौरव गांगुली म्हणाले की, "विराटला सराव करूद्या. त्याला सामने खेळुद्या. विराट हा एक महान खेळाडू आहे. त्यानं मैदानात धावांचा पाऊस पाडलाय. तो लवकरच पुनरागमन करेल, अशी मला अपेक्षा आहे. तो गेल्या 3 वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंजतोय. पण आगामी आशिया चषकात तो त्याचा फॉर्म परत मिळवेल, असा माझा विश्वास आहे."
विराटची उत्कृष्ट कारकिर्द
विराटनं भारताकडून 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं आतापर्यंत भारतासाठी 102 कसोटी, 262 एकदिवसीय आणि 99 टी-20 सामने खेळले आहेत. क्रिकेटच्या या तिन्ही फॉरमेटमध्ये मिळून त्याने 70 शतक आणि 122 अर्धशतक ठोकली आहेत. ही आकडेवारी पाहता विराटची कारकिर्द भारतीय संघासाठी किती मोठी आणि महत्वाची आहे? हे दिसतंय.
हे देखील वाचा-