Harry Brook New Zealand vs England 2nd Test : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामध्ये कसोटी मालिकेतील दुसरा सामना विलिंगटन येथे खेळला जातोय. या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक याने विनोद कांबळीचा 30 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. या सामन्यात ब्रूक याने दमदार फलंदाजी केली. ब्रूक याने पहिल्या नऊ कसोटी डावात 800 धावांपेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडला आहे. असा पराक्रम करणारा ब्रूक पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी हा विक्रम भारताच्या विनोद कांबळीच्या नावावर होता.  


न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी यावं लागले. पण इंग्लंडची सुरुवात अतिशय निराशाजनक राहिली. अवघ्या दोन धावा करुन सलामी फलंदाज जैक क्राऊली बाद झाला. त्यानंतर बेन डकेट याने नऊ धांवावर आपली विकेट फेकली. ओली पॉप सहा चेंडूत दहा धावा काढून बाद झाला. त्यामुळे इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला होता. पण त्याचवेळी जो रुट आणि हॅर ब्रूक यांनी मोर्चा सांभाळला. दोघांनी दमदार फलंदाजी करत भागिदारी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी आतापर्यंत नाबाद 294 धावांची भागिदारी केली आहे. हॅरी ब्रूक याने द्विशतकाकडे आगेकूच केली आहे. ब्रूक सध्या 184 धावांवर खेळत आहे. तर जो रुट 101 धावांवर खेळत आहे. ब्रूडने आपल्या खेळीत 24 चौकार आणि पाच षटकारांचा पाऊस पाडला आहे. 


हॅरी ब्रूकने दमदार फलंदाजी करत भारताच्या विनोद कांबळीचा 30 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. हॅरी ब्रूक याने करिअरच्या सुरुवातीला नऊ कोसोटी डावात 800 पेक्षा जास्त धावा ठोकल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज झाला आहे. ब्रूकने आतापर्यंत 9 डावात चार शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. त्यासोबतच 807 धावांचा पाऊस पाडला आहे. हा विक्रम याआधी विक्रम विनोद कांबळीच्या नावावर होता. कांबळीने कसोटीच्या पहिल्या नऊ डावात 798 धावांचा पाऊस पाडला होता. यादरम्यान कांबळीने चार शतके झळकावली होती.  
 





ब्रूकने पहिल्या नऊ डावात 800 पेक्षा जास्त धावा करत अनेक दिग्गजांना मागे टाकले आहेत. यामध्ये सुनील गावस्कर यांचेही नाव आहे. गावस्कर यांनी पहिल्या नऊ डावात 778 धावा चोपल्या होत्या.  इवर्टन वीक्स याने 9 डावात 777 धावा केल्या होत्या. दरम्यान, ब्रूकने मोक्याच्या क्षणी धावांचा पाऊस पाडला आहे. ब्रूक याने आतापर्यंत तीन वनडे सामने खेळले आहेत. त्याशिवाय  टी 20 सामन्यातही तो इंग्लंडच्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. आपल्या विस्फोटक फलंदाजीमुळे ब्रूक याने अल्पावधीतच इंग्लंडच्या संघात आपलं स्थान मजबूत केलेय.