Hardik Pandya: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याबाबत (Hardik Pandya) एक महत्वाची माहिती समोर आलीय. पांड्यानं बुधवारपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy 2021-22) हंगामात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. कारण, तो गोलंदाजीच्या बाबतीत अद्याप तंदुरूस्त नाही. बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या (BCA) एका वरीष्ठ अधिकाऱ्यानं ही माहिती दिलीय. हार्दिक पांड्यानं विजय हजारे स्पर्धेतून माघार घेतल्यानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. 


हार्दिक पांड्याला मागील काही महिन्यांपासून फिटनेसच्या समस्येचा त्रास सहन करावा लागतोय. यामुळं आयपीएलच्या मागील हंगामात हार्दिक पांड्यानं गोलंदाजी केली नव्हती. एवढेच नव्हे तर फिटनेसमुळं त्याला भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. याचदरम्यान, “बीसीएने (BCA) विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेबाबत विचारणा करण्यासाठी हार्दिकला ईमेल पाठवला होता. मागील तीन वर्ष तो बडोदाच्या संघाकडून क्वचितच खेळला आहे. मात्र त्यानं एका वाक्यात उत्तर दिले आहे की, तो सध्या मुंबईत दुखापतीवर काम करत आहे", अशी माहिती अधिकाऱ्यानं दिलीय. 


नुकताच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात हार्दिक पांड्याला काही खास कामगिरी करता आला नाही. या स्पर्धेतील काही सामन्यात त्यानं गोलंदाजी केली. परंतु, निवडकर्त्यांना प्रभावित करू शकला नाही. ज्यामुळं भारतीय संघातील त्याचं स्थान अडचणीत सापडलंय. भारतीय संघात पुनरागमन व्हावे यासाठी हार्दिक खूप मेहनत घेत आहे.


विजय हजारे ट्रॉफी 8 डिसेंबर ते 27 डिसेंबरदरम्यान होणार आहे. या स्पर्धेत 38 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे सामने देशातील सात शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. अनेक ज्येष्ठ खेळाडूही या स्पर्धेत खेळताना दिसतील. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ ठरू शकते.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-