हैदराबाद : सध्या बीसीसीआयकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचं आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेतील सामने हैदराबादच्या स्टेडियमवर सुरु आहेत. आज या स्पर्धेत पंजाब आणि बडोदा आमने सामने आले होते. भारताच्या टी 20 संघाचे स्टार खेळाडू अभिषेक शर्मा आणि हार्दिक पांड्या आमने सामने येणार असल्यानं या सामन्याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. पंजाबनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 बाद 222 धावा केल्या. यामध्ये अभिषेक शर्मा आणि अनमोलप्रित सिंग याच्या अर्धशतकाचा समावेश होता. तर,बडोद्याकडून फलंदाजी करताना हार्दिक पांड्यानं नाबाद 77 धावा करत पंजाबला पराभूत केलं.
अभिषेक शर्मा-अनमोलप्रीत सिंगची दमदार फलंदाजी
पंजाबनं पहिल्यांदा फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि अनमोलप्रीत सिंगच्या अर्धशतकांच्या जोरावर 8 बाद 222 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 18 बॉलमध्ये 50 धावा केल्या. तर, अनलमोलप्रीत सिंगनं 32 बॉलमध्ये 69 धावा केल्या. नमन धीर यानं 39 धावा करत पंजाबच्या धावसंख्येला 20 ओव्हरमध्ये 8 बाद 222 पर्यंत पोहोचवलं. बडोद्याच्या राज लिम्बानी यानं पंजाबच्या 3 विकेट घेतल्या. हार्दिक पांड्यानं चार ओव्हरमध्ये 52 धावा देत 1 विकेट घेतली.
हार्दिक पांड्याची व्याजासह परतफेड, बडोद्याचा दणदणीत विजय
पंजाबनं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 8 बाद 222 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना बडोद्याच्या विष्णू सोळंकी आणि शाश्वत रावत यांनी पहिल्या विकेट साठी 66 धावांची भागीदारी केली. शाश्वत रावत यानं 31 धावा केल्या. तर विष्णू सोळंकी यानं 43 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शिवलिक शर्मानं 47 धावा केल्या. हार्दिक पांड्या यानं नाबाद 77 धावा करत पंजाबच्या फलंदाजांनी केलेल्या धुलाईची परतफेड व्याजासह केली. हार्दिक पांड्यानं 42 बॉलमध्ये 4 षटकार आणि 7 चौकारासह नाबाद 77 धावा केल्या.
बडोद्याच्या संघानं पंजाबच्या 222 धावांचा पाठलाग 20 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर यशस्वीपणे पूर्ण केला. हार्दिक पांड्यानं तुफानी फलंदाजी करत नाबाद 77 धावा केल्या.हार्दिक पांड्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत आजच्या सामन्यात अभिषेक शर्मानं दमदार फलंदाजी केली. त्यानंतर हार्दिक पांड्यानं देखील 4 ओव्हर गोलंदाजी केली आणि त्यानंतर दमदार फलंदाजी केली.
हार्दिक पांड्या आशिया कपमध्ये दुखापतग्रस्त झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20 मालिकेला मुकला होता. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याची पुन्हा संघात निवड होऊ शकते. आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या निमित्तानं हार्दिक पांड्या पूर्णपणे फिट असणं आणि फॉर्ममध्ये असणं टीम इंडियासाठी महत्त्वाचं आहे. टी 20 वर्ल्ड कप फेब्रुवारी- मार्चमध्ये भारत- श्रीलंकेत होणार आहे.